मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : परराज्यातून अन्य जिल्ह्यात दुधाची आयात करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद आवश्यक असते. मागील काही वर्षांपासून मध्य प्रदेशातील दुधाची तुमसर तालुक्यात आयात सुरू आहे. लगतच्या राज्यामधून येणाऱ्या या दुधाची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विनातपासणी आयात होणाऱ्या या दुधाच्या गुणवत्तेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तुमसर तालुक्याची सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे. दररोज तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशातून दूध आयात होत आहे. त्यावर प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा हे दूध राज्याच्या उपराजधानीत नागपूर येथे पाठविले जाते. दर दिवशी तुमसर तालुक्यातून नागपूर येथे सुमारे एक लाख लिटर दूध विक्रीकरिता पाठविले जाते.
मध्य प्रदेशाच्या सीमेतील वाराशिवनी, कटंगी या परिसरातून हे दूध तुमसर तालुक्यात आयात होत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील या परिसरात दुधाळ जनावरांची संख्या कमी आहे. तसेच या परिसरातील दूध बालाघाट व शिवणी येथेही मोठ्या प्रमाणात जाते. त्यामुळे तुमसर तालुक्यात येणाऱ्या दुधावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राजकीय आशीर्वाददूध व्यवसाय हा नगदी व्यवसाय मानला जातो. या व्यवसायात मागील अनेक वर्षापासून एका राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेत न जाता संबंधित विभाग कागदोपत्री सर्व सोपस्कार पार पडतो काय, असा प्रश्न उपस्थित होतो. अलीकडे केमिकलयुक्त दूध बाजारात येत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील वारासिवनी व कटंगी परिसरात दुधाळ जनावरांची संख्या कमी असतानाही तिथून मोठ्या प्रमाणावर आयात होणाऱ्या दुधाबद्दल शंका उपस्थित होत आहे.
आंतरराज्य वाहतुकीला परवानगी आहे का? दूध हे नाशवंत पेय असून, खाद्यपदार्थात मोडतो. खाद्यपदार्थाची आंतरराज्यीय वाहतूक करताना यासाठी परवानगी आहे का, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या दुधाची गुणवत्तेची तपासणी नियमित न होणे, हे आश्चर्य आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाचे या प्रकाराकडे अद्याप लक्ष गेलेले दिसत नाही.
"दोन राज्यांमधून दुधाची वाहतूक होत असेल तर परवानगीची गरज नाही. मात्र टँकरमधून आलेल्या दुधाची तपासणी केली जाते. त्याची गुणवत्ता तपासली जाते. आम्ही नियमित तपासणी करत नसलो तरी करताना आकस्मिक तपासणी करीत असतो." - प्रशांत देशमुख, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, भंडारा