लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : स्वसंरक्षण होणे महत्त्वाचे आहे. परंतु यासाठी कायद्याची पायमल्ली होवू नये याची काळजी घ्यावी. परिस्थितीनुसार कायद्यात बदल होत असते. मानवी जीवनात उपदेशापेक्षा कृती अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी ‘प्रेझेंट मार्इंड’ व प्रामाणिकतेचे अनन्यसाधारण महत्त्व जपावे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.स्थानिक नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कायदे विषयक साक्षरता शिबिरात न्या. देशमुख बोलत होते. भारताचे माजी पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालक दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा व नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या स्व. बबनराव पालांदुरकर सभागृहात कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कायदेविषयक साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख हे होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक सहदिवानी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) एस.के. भट्टाचार्य, ग्राम विकास समितीचे कार्यवाह दर्शनलाल मलहोत्रा, प्राचार्य अरुण कोकवार यावेळी उपस्थित होते. अतिथीच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले न्या. एस.के. भट्टाचार्य म्हणाले, ‘सबकान्शीअस मार्इंड’चा उपयोग जिवनातील सकारात्मक गोष्टींकरिता आणला पाहिजे. सकाळ सत्रातील वेळ स्वयं व्यवस्थापनाकरिता वापरण्यात यावा. आयुष्याच्या सुरूवातीला ५ ते ७ वर्ष आपण कशी मेहनत करतो, त्यावर जिवनातील सकारात्मक वा नकारात्मक भूमिका अवलंबून असते. सकारात्मक विचार आयुष्याच्या सुरूवातीला बाळगल्यास जीवन सुखकर होते. नकारात्मक भूमिका ठेवून वाम मार्गाचा वापर आयुष्य उध्वस्त करते. रॅगिंग, सायबर क्राईम व बालकांचे अधिकारी (राईट टू चाईल्ड) या विषयावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले सध्या प्रचलित व्हाटसअप व फेसबुकचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असून त्यातून फसवणुकीचे प्रकरण वाढत आहेत. त्यामुळे फेसबुक फ्रेंड प्रक्रियेपासून सावधान रहावे. तसेच एटीएम व्हाटसअप व फेसबुकचा सुयोग्य वापर करावा. पाल्यांच्या चुका पालकांना कशा मनस्ताप देवून जातात याविषयी उदाहरण व दाखल्याचा वापर करून त्यानी कायदेविषयक विश्लेषण केले. धुम्रपान, मद्यपान या पासून दूर राहण्याचे व लग्नापर्यंत स्वत:ला सांभाळण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले. बालहक्क कायदा, स्त्रीभूण हत्या, बालमजूर कायदा आदी विषयावर त्यानी प्रकाश टाकला.याप्रसंगी ग्राम विकास समितीच्या वतीने न्या. संजय देशमुख व न्या. एस.के. भट्टाचार्य यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून संस्था सचिव दर्शनलाल मल्होत्रा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व संचालन प्रा. पितांबर उरकुडे व आभार शिक्षक मनिष मोहरिल यांनी केले. राष्ट्रगिताने शिबिराचा समारोप करण्यात आला. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
प्रामाणिकतेचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:13 AM
स्वसंरक्षण होणे महत्त्वाचे आहे. परंतु यासाठी कायद्याची पायमल्ली होवू नये याची काळजी घ्यावी.
ठळक मुद्देन्या. संजय देशमुख यांचे प्रतिपादन : नानाजी जोशी महाविद्यालयात कायदेविषयक साक्षरता शिबिर