झाडीपट्टीचे आकर्षण ठरली मंडई : लोककला जिवंतपालांदूर : दिवाळीनंतर भाऊबिजेच्या पाडव्यानंतर मंडईचा हंगाम सुरु होतो. मंडईत पाहुण्यांना आमंत्रित करून संभाव्य वधू वराबाबद चर्चा करीत संस्कृती जपली जाते. धान फसल निघून घरात आनंदी वातावरण निर्माण होते. प्राणीमात्रावर दया दाखवित शंकरपटावरील बंदी कायम असल्याने समाजाला एकत्र येऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी ‘मंडई’ हा एकच उत्सव आता ग्रामीण भागात उरल्याने मंडई उत्सवाला महत्व आले आहे. पालांदूर परिसरातील खराशी, लोहारा, वाकल येथे मंडई आटोपली असून मऱ्हेगाव (जुना) येथे उत्साहाने मंडई उत्सव पार पडला.मऱ्हेगाव येथे लोककलेचा वारसा कायम राहावा, यासाठी गावातील लोककलावंतांनी विविध वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लहान मुलांच्या खेळण्यांची भरगच्च दुकाने आकाशपाळणे, फराळांची दुकाने, भाजीपाला ही दुकान सजलेली होती. रात्रीला मनोरंजनाकरिता तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. घराघरात पाहुण्यांची रेलचेल होती. गावचे सरपंच शामाजी बेंदवार पाहुण्यांशी हस्तांदोलन करीत प्रवेशदारावर स्वागत करीत होते. झाडीपट्टीचे प्रणेते डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी दंडार, खडीगंमत, डहाका, रोवणीची गाणी अख्ख्या महाराष्ट्रात पोहचविली. लोककलेविषयी जिव्हाळा, आस्था मंडईच्या निमित्ताने जनतेसमोर आली. गणेश दंडार मंडळाची दंडार तीन तास चालली. यातून लोकांचे मनोरंजन झाले. (वार्ताहर)
शंकरपट बंदीमुळे मंडईचे वाढले महत्त्व
By admin | Published: November 12, 2016 12:36 AM