भंडारा : तुमसर तालुक्यातील चारगाव व लोहारा येथील मतदान केंद्रावर दुपारच्या सुमारास मतदान यंत्रात बिघाड आल्याच्या घटना घडल्या. यामुळे चारगाव येथे दीड तास तर लोहारा येथे अर्धातास मतदान बंद पडले होते. निवडणूक विभागाच्या सेक्टर ऑफिसर यांनी नविन मशीन पुरविल्यानंतर मतदान सुरळीत झाले. यामुळे मतदारांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
तुमसर तालुक्यातील तुमसर- मोहाडी विधानसभा अंतर्गत येत असलेल्या चारगाव येथे सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. प्रक्रिया सुरळीत सुरू होती. परंतु, दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाले. मतदान यंत्र बंद पडले. याबाबत मतदान केंद्राध्यक्ष यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर दुपारी दोन वाजता निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवीन यंत्र चारगाव येथील मतदान केंद्रात आणून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू केली.
गायमुख जंगल व्याप्त परिसरातील लोहारा गावात तीन वाजताच्या सुमारास मतदान यंत्रात तांत्रीक बिघाड आला. यामुळे सुमारे अर्धातास मतदान थांबले होते. वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांना केंद्राध्यक्षांनी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी नवीन यंत्र पुरविल्यानंतर पूर्ववत मतदान सुरू झाल्याची माहिती, लोहारा येथील वार्ताहराने दिली. रखरखत्या उन्हात आलेल्या मतदारांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला.केंद्रावर मतदारांची होती रांगचारगाव येथील केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड कशामुळे आला याबाबत स्थानिक केंद्राधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. तुमसर तालुका प्रतिनिधीने तहसीलदार खोकले यांच्याशी संपर्क करून विचारले असता त्यांनी मला काहीच माहिती नाही, असे सांगितले. सुमारे दीड तास मतदान प्रक्रिया बंद पडल्याने मतदारांची रांग या मतदान केंद्रावर लागली होती.सेक्टर ऑफिसरांकडे जबाबदारीभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी सर्व विधानसभा मतदार संघात १०८ सेक्टर ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली. १० ते १२ पोलिंग स्टेशन मिळून एक याप्रमाणे त्यांच्याकडे जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. त्यांचेकडे अतिरिक्त ईव्हिएम मशीन सोपविण्यात आल्या होत्या.