गोरेगाव :भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (दि.१९) मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच ३ वाजता केंद्रावर गेलेल्या वृद्धाला मतदान करू दिले नाही. यामुळे त्याने पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी केली.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव आणि आमगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्याने या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत ३ वाजेपर्यंतच मतदान प्रक्रिया घेण्यात आली. अशात ऐन ३ वाजता ग्राम बबई येथील रहिवासी वृद्ध सुखराम रहांगडाले (६२) मतदानासाठी केंद्रावर गेले. मात्र, मतदानाची वेळ झाल्याचे सांगून त्यांना मतदान करू दिले नाही. या प्रकारामुळे रागाविलेल्या सुखराम यांनी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी केली. याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक अजय भुसारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत सुखराम यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व अर्ध्या तासानंतर त्यांना खाली उतरविण्यात पोलिसांना यश आले. सुखराम यांना गोरेगाव पोलिसांनी पोलिस स्टेशन येथे नेले व गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.