भंडारा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत होण्याचा नेहमीचाच प्रकार असताना शुक्रवारी पहाटे तांदळाचा ट्रक उलटला आणि दिवसभर वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गाच्या दोनही बाजूंना तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कासवगतीने वाहने हळूहळू पुढे सरकत होती. तीन किमीचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत होते. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.
तांदळाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यातच नांदेड येथून एक ट्रक पोत्यांममध्ये भरून तांदूळ घेऊन शुक्रवारी येत होता. पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण वाहनावरील गेले आणि जिल्हाधिकारी कार्यालयालगत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटला. ट्रकमधील तांदळाची पोती रस्त्यावर विखुरली. आधीच दुपदरी असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धा भागात हा ट्रक पडून होता. त्यामुळे मार्गावरील वाहतूक मंदावली. पहाटेची वेळ असल्याने तेवढा प्रभाव जाणवला नाही. मात्र, सकाळी ९ वाजतापासून वाहनांच्या दोनही बाजूंना रांगा लागल्या होत्या. त्यातच सकाळी ११ वाजताच्या सुमारास ट्रक उचलण्यासाठी क्रेन आणल्याने तब्बल तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर वाहतूक सुरू झाली; परंतु अत्यंत कासवगतीने वाहने समोर जात होती. वाहतूक पोलिस खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते.
सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरातील जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक या वर्दळीच्या चौकात मोठी गर्दी दिसत होती. वाहनांच्या रांगा तीन किमीपर्यंत लागलेल्या होत्या. जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख निशांत मेश्राम आणि त्यांचे पथक दिवसभर रस्त्यावर वाहतूक सुरळीत करीत होते. या विस्कळीत झालेल्या वाहतुकीचा शहरातील नागरिकांना मोठा मनस्ताप झाला.
ट्रकला लागला कट अन् चालकांत हाणामारी
भंडारा शहरातून वाहतूक विस्कळीत झाल्याने आधीच वाहनधारक त्रस्त झाले होते. त्यातच भंडारा शहरातील पाटीदार भवनासमोर दुपारी समोरील ट्रकला मागच्या ट्रकचा कट लागला. त्यावरून दोन चालकांत चांगलीच हाणामारी झाली. त्यामुळे पुन्हा वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोनही वाहनचालकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर एक ट्रक अचानक बंद पडला. त्यामुळे आणखी भर पडली.
नांदेडचा तांदूळ कोठे चालला होता
नांदेडवरून तांदळाचे पोते घेऊन ट्रक राष्ट्रीय महामार्गाने जात होता. भंडारा शहरात उलटल्यानंतर संपूर्ण तांदळाचे पोते रस्त्यावर विखुरले होते. या ट्रकमध्ये राशनचा तांदूळ प्लॉस्टिकच्या पोत्यांमध्ये भरलेला होता. भंडारा जिल्हा तांदळाचे कोठार असताना नांदेडवरून हा तांदूळ कशासाठी येत होता हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे अनेक राईस मिलर्स परजिल्ह्यातून राशनचा तांदूळ विकत आणून त्याचा शासनाला पुरवठा करीत असल्याचे प्रकरण पुढे आले होते. तोच तर प्रकार नाही ना, अशी चर्चा अपघातस्थही रंगली होती.