भंडारा : महाविकास आघाडीचे सरकार काेसळले आणि आता एकनाथ शिंदे सरकार सत्तारूढ हाेत आहे. या नव्या सरकारमध्ये भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला मंत्रिपद येणार की महामंडळावरच समाधान मानावे लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे गटात सहभागी झालेले भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भाेंडेकर यांनी यासाठी माेर्चेबांधणी सुरू केली असून सध्या त्यांच्याच नावाची चर्चा आहे.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टाेकावर असलेल्या भंडारा जिल्ह्याला नवीन मंत्रिमंडळात सन्मानाचे स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात तीन आमदार असून राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि अपक्ष असे प्रत्येकी एक आमदार आहे. त्यापैकी अपक्ष आमदार नरेंद्र भाेंडेकर एकनाथ शिंदे यांच्या अगदी निकटस्थ आहेत. सुरुवातीला आमदार भाेंडेकर यांना महाविकास आघाडीत महामंडळ मिळणार अशी जाेरदार चर्चा सुरू हाेती. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांना महामंडळ मिळेल असे सांगितले जात हाेते. मात्र महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि महाविकास आघाडी काेसळले. दरम्यान, आमदार भाेंडेकर एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. सुरतपासूनच ते शिंदे यांच्या सोबत आहेत.
गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये आमदार भोंडेकर यांचा वाढदिवस जोरात साजरा करण्यात आला. एकनाथ शिंदे केक भरवित असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेही आमदार भाेंडेकर आणि एकनाथ शिंदे यांची पूर्वीपासूनच जवळीक आहे. त्यामुळे नवीन मंत्रिमंडळात आमदार भाेंडेकर यांना महत्त्वाचे पद मिळण्याची संधी आहे. मंत्रिपद मिळते की महामंडळ याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महाविका आघाडी सरकारमध्ये साकोलीचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्षपद मिळाले होते. मात्र, त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्त्पूर्वी युती सरकारमध्ये विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके मंत्री होते. तर त्यापूर्वी राज्यमंत्री म्हणून सावरबांधे यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली होती. मात्रस मंत्रीमंडळात सन्मानाचे स्थान मिळण्यात जिल्हा कायम उपेक्षित आहे. आता सन्मानाचे मंत्रीपद मिळणार काय, याकडे जिल्ह्यावासियांचे लक्ष लागून आहे.
आता पालकमंत्रिपदी काेण?
भंडारा जिल्ह्याचे बहुतांशवेळा बाहेरच्या मंत्र्यांकडेच पालकत्व देण्यात आले आहे. भाजप-सेना युतीच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे त्यानंतर आमदार डाॅ. परिणय फुके यांना भंडाऱ्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले हाेते. तर महाविकास आघाडीत सुरुवातीला सुनील केदार आणि त्यानंतर डाॅ. विश्वजीत कदम यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्यात आले. स्थानिक पालकमंत्री असल्यास विकासाला चालना मिळते. सर्व राजकीय घडामाेडींवर त्यांचे लक्ष असते. आता नवीन सरकारमध्ये जिल्ह्यातील आमदाराला मंत्रिमंडळात संधी देऊन पालकमंत्री करावे अशी भावना आहे.