भंडारा : शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज सोमवारी भंडारा येथे येत आहेत. त्यांच्या या दौरादरम्यान काळे झेंडे दाखवून निषेध करण्याची घोषणा काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीने काल केली होती. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून भंडारा शहर पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले.
राज्यातील आणि जिल्ह्यातील सामाजिक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री आणि त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्याची घोषणा काल काँग्रेसने बैठकीत केली होती. त्याप्रमाणे आज नियोजनही केले होते. यादरम्यान आज सकाळी सहा वाजता जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांना त्यांच्या गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पवनी पोलीस स्टेशनला ठेवले आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष अजबले यांना पाहुणे तालुक्यातील रविवारी सायंकाळी पाच वाजता ताब्यात घेण्यात आले त्यांना रात्रभर पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले आहे याप्रमाणे यांनाही सोमवारी सकाळी आठ वाजता जवाहर नगर येथून ताब्यात घेण्यात आले. काँग्रेसचे पदाधिकारी पवन वंजारी, बाळू ठवकर, आकाश ठवकर, आणि अन्य कार्यकर्त्यांना भंडारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांचे मेडिकल करण्यात आल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमी पोलिसांनी केलेल्या या धरपकडीचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त होत आहे.
रुग्णवाहिका संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोलिसांच्या ताब्यातरुग्णवाहिका संघटनेचे जिल्हाध्यक्ष जय उर्फ जितू डोंगरे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भंडारा तालुक्यातील पहेला या गावातून त्यांना आज सोमवारी सकाळी सहा वाजताच पोलिसांच्या ताफ्याने जाऊन त्यांना ताब्यात घेतले. प्रत्यक्षात आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांना सेवा देण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून त्यांना ओळखपत्र सुद्धा जारी करण्यात आले होते. यापूर्वी त्यांनी कंत्राटी चालकांच्या प्रश्नांवर आत्मदहनाचा इशारा दिला होता. या कारणावरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.