पालांदूर : गणराज बाबा सुशिक्षित बेरोजगार संस्था मेंगापूर/कवलेवाडा अंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन सरपंच नरेश फुंडे लोहारा व शेतकरी केशव चौधरी, पांडुरंग मेंढे, विलास मेश्राम, कैलास मेश्राम, मोरेश्वर खंडाईत रवींद्र निखाडे, ग्रेडर निखिल खंडाईत, हमाल लीडर ताराचंद मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
उन्हाळी धान खरेदीकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. नोंदणी आधारभूत केंद्रातील कार्यालयात सुरू आहे. तलाठी कार्यालय व आधारभूत केंद्रात शेतकरी गर्दी करीत आहेत. आधारभूत भावात धान विकावा या आशेपोटी जगाचा पोशिंदा स्वतः उपाशी राहून शासकीय नियमांचे उंबरठे झिजवत आहे. ३१ मे ही नोंदणीची अंतिम घटिका ठरलेली आहे. ती चुकू नये याकरीता शेतकरी तळमळत आहे.
संस्थेचे ग्रेडर निखिल खंडाईत शेतकऱ्यांचे सातबारा व इतर माहिती संकलित करीत संगणकावर नोंदणी करीत आहेत. शेतकरी वर्गाने शासन व प्रशासनाच्या सूचनेनुसार ऑनलाईन नोंदणीकरीता सहकार्य करावे, अशी अपेक्षा संस्थेच्या संचालकांनी केली आहे.
उन्हाळी धान खरेदी थेट एक महिना उशिराने सुरू होत आहे.
शेतकरीवर्ग राजकीय लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणाने भरडला जात आहे. १ मे हा उन्हाळी धान खरेदी केंद्राचा मुहूर्त असूनही शासन प्रशासनाने मुहूर्ताला किंमत दिली नाही. याचे परिणाम शेतकरी वर्गाला सहन करावे लागत आहेत. परिणामी आधारभूत केंद्र व मिलर्स यांनासुद्धा शासनाच्या दुटप्पी धोरणाचा फटका बसलेला आहे. खुल्या नभाखाली शेतकरी हितार्थ राजकीय नेत्यांच्या शब्दाला किंमत देण्याकरीता खरीप हंगामात धान खरेदी करण्यात आला. मात्र, त्याची उचल विहित वेळेत न झाल्याने आधारभूत केंद्रांना मोठी किंमत चुकवावी लागण्याची दाट शक्यता आहे. मिलर्स यांचासुद्धा तीन महिन्यांचा कालावधी मोकळा गेल्याने त्यांच्यावरही आर्थिक संकट कोसळले आहे. एकंदरीत शासन व प्रशासनाच्या हेकेखोर धोरणाने शेतकरी, आधारभूत केंद्र व मिलर्स यांची गळचेपी होत आहे. चंद्रकुमार खंडाईत, तिलक जवंजाळ, अनिल मेश्राम, अभिलाष खंडाईत, भूपेश मेश्राम आदी उपस्थित होते.