प्रभाव लोकमतचा : शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, बाळा काशीवार यांचा पुढाकारदिघोरी (मोठी) : धान खरेदी केंद्र व्यापाऱ्यांसाठी होणार सुरु. दिघोरीतील आधारभूत धान खरेदी केंद्र बंद आणि धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनाला लागले ग्रहण, एकाच आठवड्यात एकापाठोपाठ एक वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करून धान खरेदी केंद्र सुरु होण्यासाठी वाचा फोडली. यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी खळबळून जागे झाले. अखेर धान खरेदी केंद्र लवकर सुरु व्हावा, याकरिता प्रयत्नाला लागले. आमदार बाळा काशीवार यांनी गोदाम मालक व शेतकरी यांच्या अडचणी जाणून घेतल्या व गोदाम मालकांच्या भाड्याचा प्रश्न लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. यामुळे सोमवारी आमदार बाळा काशीवार यांचे हस्ते धान खरेदी केंद्राचे रितसर उद्घाटन करण्यात आले.दिघोरी येथील गोदाम मालकाचे मागील १० वर्षांपासून गोदामाचे भाडे शासनाकडे थकीत आहेत. हे भाडे अजूनपर्यंत न मिळाल्याने व नवीन कायद्यानुसार केवळ दोन महिन्याचे गोदामाचे भाडे मिळणार असल्याचे पत्र गोदाम मालकांच्या हाती लागल्याने यावर्षी गोदाम धान खरेदी केंद्राला किरायाणे न देण्याचे ठरविले. गोदाम मालक व शासन यांच्या वादात विनाकारण शेतकऱ्यांची फरफट होत असल्याने व हजारो पोती उन्हाळी धान शेतकऱ्यांनी गोदामासमोर ठेवल्याने आता धान कुठे विकावे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला होता.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत 'लोकमत'ने पुढाकार घेऊन एकाच आठवड्यात तीन वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर प्रशासन, लोकप्रतिनिधी खळबळून झाले झाले. कुठल्याही परिस्थितीत गोदाम सुरु करता येईल, यासाठी सर्वजण कामाला लागले. पण कुणाही शासकीय अधिकाऱ्याला गोडावून सुरु करता आले नाही. याची दखल आमदार काशीवार यांनी घेतली व प्रशासनाला गोदाम भाड्याविषयी जाब विचारला. भाडे केव्हा मिळणार, किती मिळणार इत्यादी विषयावर चर्चा केली. गोदाम मालकाला शासनाने जर तुझे भाडे दिले नाही तर मी स्वत: देणार, असे शेकडो शेतकऱ्यांसमोर त्यांनी कबुल केले. धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी गोदाम द्या, असे हक्काने सांगितले. यावर गोदाम मालक तयार झाले आणि शेतकऱ्यांवर इतरत्र कमी दरात धान विकण्याची जी वेळ आली होती ती वेळ आमदार बाळा काशीवार यांच्या विशेष प्रयत्नाने व लोकमतच्या पुढाकाराने टळली. अनेक दिवसांपासून धान खरेदी विषयी शेतकऱ्यांमध्ये शंका कुशंका निर्माण करण्यात येत होती. मात्र लोकमतचा पुढाकार व आमदार बाळा काशीवार यांची महत्वांकाक्षा यामुळे सोमवारी आमदार बाळा काशीवार यांचे हस्ते धान खरेदी केंद्राचे रितसर उद्घाटन करण्यात आले. लोकमत व आमदार काशीवार यांनी केलेल्या प्रयत्नाला यश येताच शेकडो शेतकऱ्यांनी आनंदाने आभार व्यक्त केले. (वार्ताहर)
धान खरेदी केंद्राचे उद्घाटन
By admin | Published: May 24, 2016 12:58 AM