करडी(पालोरा): जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय पालोरा येथे करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल नेवसे यांचे हस्ते सुविधायुक्त स्वतंत्र वाचन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ठाणेदारांनी स्वखर्चातून शाळेला विविध स्पर्धा परीक्षांचा संच भेट दिला. मान्यवरांनी वाचन कक्ष, कृषी व हेल्थ केअर प्रयोगशाळेची पाहणी करून विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रेरणादायी कार्याची प्रशंसा केली. तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनीसुद्धा याचवेळी विद्यार्थ्यांना कृषीविषयक पुस्तकांचा संच स्वखर्चातून भेट देण्याची घोषणा केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज गोमासे होते. प्रमुख अतिथी म्हणून करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल नेवसे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, शाळेचे प्राचार्च सुनील खंडाईत प्रामुख्याने उपस्थित होते.
ठाणेदार स्वप्निल नेवसे यावेळी म्हणाले, विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमांबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. त्यासाठीच शाळेला एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरतील, अशा स्पर्धा संच भेट दिला आहे. फावल्या वेळेत वाचन कक्षात बसून विद्यार्थ्यांनी स्पर्धा पुस्तकांचा लाभ घेऊन मिळालेल्या संधीचे सोने करावे. हेल्थ केअर व कृषीविषयक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे असल्याने विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा, असे मनाेगत व्यक्त केले.
तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे म्हणाले, शेती हा ग्रामीण भागाचा आत्मा व अन्नधान्याचा भंडार आहे. परंतु आजची नवी पिढी याकडे दुर्लक्ष करून आहे. विद्यार्थीदशेतच शेतीची आवड निर्माण व्हावी, या हेतूने शासनाने कृषी विषय वर्ग ९ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे. पालोरा शाळेत कृषीविषयक सुसज्ज प्रयोगशाळा आहे. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेता आणखी कृषीविषयक अभ्यासासाठी पुस्तकांचा संच शाळेला भेट देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मुनिन खंडाईत यांनी करून शाळेच्या प्रगतीचा आढावा मान्यवरांसमोर ठेवला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज गोमासे यांनी दोन वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या दमदार कामगिरीची व विविध उपक्रमांची माहिती दिली. ठाणेदार स्वप्निल नेवसे यांनी स्पर्धा परीक्षांचा संच भेट देत ‘शब्द’ पाळला तर शिवाजी मिरासे यांनी वेळेत कार्यक्रमास उपस्थिती दाखवून ‘शब्दा’चे पक्के असल्याचा परिचय दिला असल्याने दोन्ही अधिकारी शब्द पाळणारे आहेत, असे मनोगत व्यक्त करत त्यांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने वर्ग ९ ते १२ वीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.