पवनी/ आसगाव : आठवडी बाजारातील पाणीपुरी खाणे एका ११ वर्षीय बालिकेच्या जीवावर बेतले तर तब्बल ७८ जणांना विषबाधा झाली. मंगळवारी उघडकीस आलेल्या या घटनेने पवनी तालुक्यातील १२०० लाेकवस्तीचे भेंडाळा गाव हादरून गेले. तर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मंगळवारी सकाळपासून आराेग्य विभागाचे पथक गावात तळ ठाेकून असून, १९ जणांवर पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धाेक्याबाहेर असून, प्रशासनाने पाणीपुरीचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
पवनी तालुक्यातील भेंडाळा येथे रविवारी आठवडी बाजार भरताे. या बाजारात विविध वस्तूंसह खाद्यपदार्थांची दुकाने लागतात. गावातीलच एका व्यक्तीचे पाणीपुरीचे दुकानही असते. नेहमीप्रमाणे रविवारी अनेकांनी या ठिकाणी पाणीपुरीचा आस्वाद घेतला. रात्री काही जणांना मळमळ आणि उलटी हाेऊ लागली. परंतु फारसे कुणी लक्ष दिले नाही. काहींनी खासगी डाॅक्टरांकडून उपचार करून घेतले. दुसऱ्या दिवशी साेमवारीही हाच त्रास अनेकांना जाणवू लागला. परंतु कुणालाही त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही. मळमळ आणि उलटी हाेत असलेल्यांनी आसगाव, पवनी येथील रुग्णालयात उपचार करून घर गाठले. दरम्यान, मंगळवारी सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वरी रामदास सतीबावणे (११) या बालिकेचा मृत्यू झाला. तिनेही आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्ली हाेती. तिलाही दाेन दिवसांपासून मळमळ आणि उलट्या हाेत हाेत्या. मंगळवारी सकाळी ९ वाजता तिला अचानक भाेवळ आली आणि काही कळायच्या आत घरी तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली. मळमळ आणि उलटीचा त्रास हाेत असलेल्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. तालुका यंत्रणेला याबाबतची माहिती देण्यात आली. तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. तलक अन्सारी, वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रशांत भैसारे, डाॅ. आम्रपाली भाेवते, डाॅ. अश्विन गाेटेफाेडे, डाॅ. राेहित वालदे, डाॅ. धनश्री खंडाईत, डाॅ. रितु गहलाेत यांनी भेंडाळा गाठून ग्रामपंचायत कार्यालयात शिबिर सुरू केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माेहन पंचभाई, सरपंच स्वाती पारधी, उपसरपंच गुड्डू बावनकर उपस्थित हाेते. रुग्णांच्या उपचारासाठी त्यांनी मदत केली.
दरम्यान, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रियाज फारुखी, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, उपविभागीय पाेलीस अधिकारी रीना जनबंधू, पाेलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी भेंडाळा येथे भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी आराेग्य यंत्रणेला उपचारासंदर्भात सूचना करत पाणीपुरीचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, १९ जणांना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. गुरुचरण नंदागवळी, डाॅ. निशांत माेहरकर, डाॅ. चेतना वाघ, डाॅ. याेगेश रामटेके, डाॅ. दिघाेरे यांच्या पथकाने उपचार केले. तूर्तास सर्वांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
बाॅक्स
ज्ञानेश्वरीने साेमवारी भरला शिष्यवृत्तीचा अर्ज
भेंडाळा येथील ज्ञानेश्वरी सतीबावणे या ११ वर्षीय बालिकेचा पाणीपुरीच्या विषबाधेने मृत्यू झाला. तिने रविवारी आपल्या आईसाेबत आठवडी बाजारात जाऊन पाणीपुरी खाल्ली हाेती. तिला मळमळ हाेत हाेते; मात्र खासगी डाॅक्टरांकडून उपचार केल्याने बरे वाटू लागले. साेमवारी ती आपल्या गणेश विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी गेली हाेती. साेमवारी दिवसभर तिची प्रकृती बरी हाेती; मात्र मंगळवारी सकाळी ९ वाजता अचानक तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिला पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डाॅक्टरांनी तपासताच मृत घाेषित केले. विशेष म्हणजे तिच्या आईलाही विषबाधा झाल्याने तिच्यावरही पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वरीचे आई-वडील शेतमजुरी करतात. तिला एक भाऊ आणि एक बहीण आहे. मंगळवारी सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.