सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाचे आधारे केंद्र शासनाच्या वतीने घरकुलांसाठी पात्र ''ब'' यादीतील लाभार्थ्यांनाच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दीड लक्ष रुपयांच्या घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला. सन २०२२ मध्ये ''ब'' घरकुल लाभार्थ्यांची यादी पूर्ण होईल. दिवाळीनंतर 'ड ' यादीतील घरकुल मिळण्यास प्रारंभ होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु प्रशासनामुळे वंचित असलेल्यांवर पुन्हा एकदा अन्याय होणार आहे.
शासनाच्या मान्यतेनंतर ग्रामपंचायतीचे वतीने ''ड'' यादीसाठी नावे प्रस्तावित करण्यात आली होती. संबंधित ग्रामपंचायतींनी ग्रामसभेतून गरवंतांच्या नावाची यादी तयार करून संबंधित विभागाकडे ऑनलाईन व नियोजनासाठी पाठविली होती. अपात्र लाभार्थी व सरपंचांनी यासंबंधी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी ऑपरेटरांमुळे चूक झाल्याचे मान्य केले आहे. परंतु अजूनही चुकांची दुरुस्ती केलेली नाही.
ढिवरवाडा येथे ''ड'' यादीसाठी २५० लोकांची नावे प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु १६५ लोकांनाच मंजूर झालेल्या ऑनलाईन यादीत पात्र ठरविण्यात आले. प्रशासनाने दुरुस्ती करावी, त्यानंतर ''ड'' यादीतील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ढिवरवाडाचे सरपंच धामदेव वनवे यांनी दिला आहे.