कर्मचाऱ्यांचा अभाव : पेन्शनधारक, शेतकरी व महिलांना करावी लागते तासन्तास प्रतीक्षा
तुमसर : शहरात असलेली बँक ऑफ इंडियाची शाखा जुनी राष्ट्रीयीकृत बँक आहे. सदर बँकेत ३० हजारांवर खातेदार आहेत. मात्र सदर बँकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुरेशा संख्येअभावी येथे ग्राहकांना आर्थिक व्यवहारासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषकरून शासनाच्या विविध योजनेच्या महिला लाभार्थींचीही येथे ससेहोलपट होत आहे.
सदर बँक शाखा तुमसर शहरात एका छोट्याशा भाड्याच्या इमारतीत आहे. ग्राहकांसाठी व्यवस्था नाही. अपुऱ्या जागेत इतर कामांचे टेबल ठेवण्यात आले आहे. ग्राहकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. बँकेसमोरील रस्ता अरुंद असल्याने ये-जा करताना ग्राहकांना एकमेकांचा धक्काही लागतो. आता उन्हाळा सुरू असल्याने बँकेचे प्रवेशद्वाराच्या बाहेर खातेदार भरउन्हात उभे राहू शकत नाही. बाहेर सावलीची कोणतीही सुविधा नसल्याने खातेदारांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. एकच कॅश काउण्टर असल्याने खातेदारांना दिवसभर उभे राहावे लागते. सदर बँकेत अधिकाऱ्यांसह एकूण १२ कर्मचारी आहेत.
येथे चार अधिकारी व सहा कर्मचारी आणि दोन सब स्टाफ असे एकूण १२ पदे मंजूर आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथील पदे रिक्त आहे. आणि कोरोना संसर्गामुळे बँकेतील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती बँक प्रबंधकांनी दिली. कार्यरत व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. ग्रामीण भागातूनही शेकडो खातेदार दररोज या शाखेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी येतात. मात्र त्यांनाही चार ते पाच तास काम होण्यासाठी थांबावे लागते. दूरवरून आलेल्या ग्राहकांना घरी जाण्यास सायंकाळचे ७ वाजतात. आर्थिक व्यवहार गतीने होण्यासाठी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पुरेसे कर्मचारी नियुक्त करावे.
अतिरिक्त काउण्टरची व्यवस्था करावी, शासकीय योजनेच्या लाभार्थींसाठी स्वतंत्र काउण्टरची व्यवस्था करावी, प्रशस्त इमारतीची व्यवस्था करावी, जेणेकरून ग्राहकांची सुविधा होईल, अशी मागणी खातेदारांसह शिवसेनेच्या वतीने या बँक व्यवस्थापनाकडे करण्यात आली. यावेळी बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक प्रदीप हंबर्डे यांना निवेदन देण्यात आले. तसेच या निवेदनाची प्रत बॅंक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक, नागपूर व नगरपालिका, तुमसर यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख अमित मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, सतीश बन्सोड, अरुण डांगरे, निखिल कटारे, मनीष आंबिलडुके आदी उपस्थित होते.