संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने भूजल पातळीत ०.६१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली असून उन्हाळ्यात जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट राहणार नसल्याचे संकेत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक पाणी पातळीत पवनी तालुक्यात ०.९५ मीटर तर सर्वात कमी तुमसर आणि भंडारा तालुक्यात ०.२३ मीटर वाढ झाली आहे.भंडारा जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. सिंचन प्रकल्प आणि तलाव तुडूंब भरले आहेत. यासोबतच भूगर्भातील जलपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ७४ विहिरींचे निरिक्षण केले. त्यावेळी सरासरी पाणी पातळी १.८८ मीटर असल्याचे नमूद करण्यात आले. गत पाच वर्षाच्या तुलनेत ०.१६ मीटर ने पाणी पातळी घटली असली तरी यंदा प्रशासनाला चिंतेचे कारण दिसत नाही.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १२८० मिमी. असून जुन ते सप्टेंबर या कालावधीत १२२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरसरीच्या ४.१४ मिमी कमी पावसाची नोंद करण्यात आली. मात्र त्याचा भूगर्भातील जलसाठ्यावर अपेक्षीत परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असल्याने भूगर्भातील जलपातळी टिकून असते. तलावांमुळे गावातील विहिरींच्या जलपातळीतही वाढ होते. प्रशासनाने भंडारा जिल्हा टँकरमुक्त घोषीत केला आहे.भंडारा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी २.१९ मीटर पाणी पातळी आढळून आली. तालुक्यात ०.२३ मीटरने वाढ नोंदविण्यात आली. मोहाडी तालुक्यात १.९२ मीटर भूजल पातळी असून ०.४४मीटरने वाढ झाली आहे. तुमसर मध्ये २.३६ मीटर भूजल पातळी असून ०.२३ मीटरने वाढ झाली आहे. साकोली तालुक्यात १.३० मीटर भूजलपातळी नोंदवीली असून त्यात ०.६८ मीटरने वाढ झाली आहे. लाखनी तालुक्यातील ०.९७ मीटर भूजलपातळी नोंदविली असून ०.८८ मीटरने त्यात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ पवनी तालुक्यात ०.९५ मीटरने नोंदविण्यात आली असून येथील भूजल पातळी ३.४६ मीटर आहे. लाखांदूर तालुक्यात ०.८९ मीटर भूजल पातळी नोंदविण्यात आली आहे.७८२ गावांमध्ये पुरेसे भूजलभूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील भूगर्भातील पाणीपातळीचा अहवाल सप्टेंबर महिण्यात तयार केला असून त्यानुसार जिल्ह्यातील ७८२ गावांमध्ये पुरेसे पाणी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात २५ पाणलोट क्षेत्र असून एकाही गावात आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पाणी टंचाई भासली नाही. तसेच जानेवारी ते मार्च या कालावधीतही जिल्ह्यातील एकाही गावात पाणी टंचाई भासणार नाही असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
पाण्याचा वापर जपून करापाणी म्हणजे जीवन होय. भंडारा जिल्हा पाण्याच्या बाबतीत समृध्द जिल्हा म्हणून ओळखला जातो. १३०० च्या वर तलाव आणि विशाल पात्र असलेली वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यातून वाहते. यामुळे भूगर्भातील जलपातळी समाधानकारक असते. ग्रामीण भागात पाण्याचा वापर काटकसरीने केला जात असला तरी शहरी भागात मात्र पाण्याची उधळपट्टीच होते. पाण्याचा आतापासून काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून जावू नये यासाठी जलपूनर्भरणाचे प्रकल्प राबविण्याची गरज आहे. अन्यथा काही दिवसात भंडारा जिल्ह्यावरही पाणी टंचाईचे संकट घोंगावल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनाने यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या लेखी पाणी टंचाई नसली तरी अनेक गावात मे महिन्याच्या शेवटी पाणी टंचाई जाणवते. या गावांसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची ही गरज आहे.