लाखांदूर : तालुक्यातील अनेक गावे जंगल परिसरात आहेत. त्यामुळे या जंगलात मानवाचा हस्तक्षेप वाढल्याने प्राण्यांचे गावाकडे होत असलेली धूमजाव चिंतेचा विषय ठरला आहे. वनविभागाचा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर बिबट्यांची संख्या वाढली असून वनविभाग त्यांचेवर लक्ष ठेवून आहे.मागीलवर्षी नरबळी वाघाने पाच जणांचा नरडीचा घोट घेतला होता. त्यामुळे काही दिवस जंगलाला लागून असलेल्या गावाला भितीचे वातावरण पसरले होते. वनविभागाने त्या नरबळी वाघाच्या गोठ्या घालून ठार केले. मात्र बिबट्यांची होत असलेली गावाकडे कुच चिंतेचा विषय झाला आहे. दांडेगाव, दहेगाव, मुरमाडी, पारडी, मुर्झा, झरी, पिंपळगाव, मानेगाव हे गाव जंगल व्याप्त आहेत. त्यामुळे रात्री वन्यप्राण्यांचे गावाकडे ये-जा असते. अद्याप बिबट्याने मनुष्यावर हल्ला केला नसला तरी गाय-म्हशी-शेळ्यांची अनेकदा शिकार केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. बिबट्याच्या हल्ल्याच्या सर्वात जास्त घटना दांडेगाव येथे घडल्याची माहिती वनविभागाकडे आहे. लाखांदूर-साकोली मार्ग दांडेगाव जंगलातूनच जातो. रात्री याच मुख्य रस्त्यावरून वन्यप्राणी भ्रमण करतात. त्यामुळे वन्यप्राण्यांची वाहनाला धडक घेवून मृत्यूमुखी पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेकांना व्यंगत्व आले. त्यामुळे हा मार्ग रात्री प्रवास करण्यासाठी धोक्याचा झाला आहे. अनेकदा याच मार्गावर बिबट्याचे दर्शन झाले. गुराख्यांना मात्र दररोज बिबट्याचे दर्शन होत असले तरी अद्याप हल्याची घटना घडली नाही. वनविभागाचे कर्मचारी या परिसरात गस्तीवर असतात. त्यामुळे त्यांना बिबट्यांच्या संख्येचा आकडा वाढल्याचे आढळून आले.(तालुका प्रतिनिधी)
दांडेगाव जंगलात बिबट्याच्या संख्येत वाढ
By admin | Published: December 20, 2014 12:36 AM