सध्या प्रशासन कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ नये, यासाठी काळजी घेत आहे.
नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोंढा येथील जनावरांचा बाजार विदर्भात प्रसिद्ध आहे. येथे दर बुधवारला नागपूर, तसेच इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात व्यापारी, ग्राहक बाजारात गाय, म्हैस, विक्री, खरेदी करण्यासाठी येत असतात. १००च्या आसपास चारचाकी वाहने बाजार रोडलगत उभी असतात, यावरून याची कल्पना येते. कोंढा येथे बुधवारला वाहनांची प्रचंड गर्दी होते, राज्यमार्गावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे वाहतुकीची कोंडी होते, दर बुधवारला एक वाहतूक पोलीस यासाठी ड्युटीवर असतो, पण त्याचे लक्ष चारचाकी वाहनधारक यांचेकडून प्रति वाहन १०० रुपये वसूल करण्याकडे असल्याने वाहतुकीच्या कोंडीकडे दुर्लक्ष होते. नागपूर व इतर जिल्ह्यांतील व्यापारी म्हैस, गाय खरेदी करून चारचाकी वाहनाने नेत असतात. बाजारात खरेदी-विक्री करताना, सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. म्हणजे लोक बेफिकीर झाले, असे वाटत असून, ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, जिल्हाधिकारी भंडारा यांनी धार्मिक उत्सव, यात्रा, मंगलकार्यालये, सभा यांना ५० व्यक्ती उपस्थित राहण्याची परवानगी असताना बाजारात प्रचंड गर्दी होते आहे. येथे अनेक लोक मास्कचा वापर करीत नाहीत. फिजिकल अंतराचे पालन केले जात नाही. परिसरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.