भंडारा/वरठी : उन्हाळ्याची सुरूवात झाली असताना रविवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह तासभर गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा, वरठी यासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मागील आठवडाभरापासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेकांनी कुलर व वातानुकूलित यंत्र सुरू केलेले आहेत. दिवसभर उष्णतेचा पारा चढलेला असतो. त्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतुकीवर परिणाम जाणवू लागला आहे. रविवारला सकाळपासून वातावरणात मोठा बदल जाणवत होता. सायंकाळी ५.३० वाजाताच्या सुमारास अचानक मेघ दाटून आले व गारांसह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. सुमारे एक तास पडलेल्या गारांसह पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला असून उष्णतेच्या प्रखरतेतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची वीज सेवा खंडीत झाली. सुमारे तासभर विद्युत पुरवठा बंद होता. तुमसर : तालुक्यात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला असला तरी शेत पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उसर्रा : सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात उर्सरा येथील हरदास चव्हाण यांच्या घरावरील टिनाचे छत उडाले. जिवत हानी झालेली नसली तरी त्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गारांसह अवकाळी पावसाची हजेरी
By admin | Published: March 28, 2016 12:23 AM