जिल्हाधिकारी : वृक्षारोपणासाठी उद्योग समूहाचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून लोकसहभागातून जिल्हयातील ४० तलावातील गाळ काढून शेतीत टाकण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून जिल्हयातील उद्योग समुहांनी आपल्या सीएसआर निधीमधून तलावातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या विषयावर उद्योग समुहांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप वनसंरक्षक उमेश वर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, शिल्पा सोनाले, लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पी.एस. पराते व उद्योग समुहाचे प्रतिनिधी उपस्थित होते. माजी मालगुजरी तलावाचे खोलीकरण करुन जास्तीत जास्त पाणी साठविल्यास सिंचनासाठी लाभ होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यानुसार शासनाच्या गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत ४० तलावाचे खोलीकरण करुन लोकसहभागातून गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच वृक्ष लागवड मोहिम मोठया प्रमाणात हाती घेण्यात येणार असून यासाठी सुध्दा योगदान द्यावे. वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांची ग्रीन आर्मी तयार करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना वन विभागातर्फे वृक्ष मोफत पुरविले जातील. विद्यार्थ्यांनी हे वृक्ष लावून तीन वर्ष जतन करावे अशी संकल्पना असून यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेवून बक्षिस देवून गौरविण्यात येईल. उद्योग समुहाला सुध्दा वन विभागातर्फे रोप पुरविण्यात येतील. नर्सरीसाठी जागाही उपलब्ध करुन देण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
गाळयुक्त शिवारमध्ये उद्योग समूहाने सक्रिय सहभाग घ्यावा
By admin | Published: May 13, 2017 12:23 AM