यंदाच्या खरिपात तालुक्यात जवळपास २८ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. ही लागवड अपर्याप्त पावसामुळे कृषी वीज पंप, इटियाडोह धरण व गोसेखुर्द डाव्या कालव्याने उपलब्ध सिंचन सुविधांतर्गत करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, खरीप हंगामाच्या प्रारंभात लागवड केलेल्या धानपिकावर खोडकिडा, करपा, गादमास आदी कीडरोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. तथापि, शेतकऱ्यांनी विविध कीटकनाशकांची फवारणी केल्याने धान पिकावरील सदर कीडरोग परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, गत काही दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वातावरण बदलात उकाडा वाढल्याने लागवडीखालील पिकांवर विविध कीडरोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.
दरवर्षी सप्टेबर महिन्याच्या प्रारंभास तुडतुडा कीडरोगाचा धानपिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. यावर्षीदेखील या कीडरोगाच्या प्रादुर्भावाला प्रारंभ झाला असून, काही भागांत पाने गुंडळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती देण्यात आली. धानपिकावरील कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.