पालांदूर : चुलबंद खोऱ्यात उन्हाळी धान पिकाचा हंगाम सुमारे बाराशे हेक्टर क्षेत्रात लागवडीखाली आलेला आहे. नव्वद टक्केच्या वर रोवणी आटोपलेली आहे, तर केवळ दहा टक्के रोवणी शिल्लक आहे. झालेल्या रोवणीला खोडकिडीचा त्रास सुरू झालेला आहे. शेतकरी वर्गाने खोडकिडीच्या नियंत्रणाकरिता वेळीच नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात बागायतीसह उन्हाळी धानाचा हंगामसुद्धा सुमार आहे. जानेवरी महिन्यापासून रोवनीचा हंगाम सुरू झालेला आहे. कठाणमाल व रोवणी एकाच वेळेस येत असल्याने मजूरटंचाईचा सुमार सामना शेतकरीवर्गाला करावा लागत आहे. मजूर टंचाईमुळे शेती कसायला अडचण भासत आहे. यांत्रिक शेती सुमार प्रगतीवर असली तरी काही कामे मजुरांशिवाय अशक्य आहेत. शेतीच्या कामाला ट्रॅक्टर मात्र वरदान ठरला, हे त्रिवार सत्य कुणीही नाकारू शकत नाही!
गत जानेवारी महिना हा थोडासा उष्ण ठरला, तर फेब्रुवारी महिना हा थंड जाणवत आहे. रात्रीला गारवा जाणवत असून, दुपारच्या वेळेला उष्णता जाणवते. रात्रीला आर्द्रता पण अधिक असते. थोडेफार ढगाळ वातावरणसुद्धा आहे. अशा या हवामानातील बदलामुळे किडीच्या संक्रमण चक्राला गती अधिक मिळते. जागरूक शेतकरी नेहमीच पिकाची पाहणी करून नियंत्रण करतो. अल्पभूधारक वेळीच काळजी घेतो. मात्र, मोठा शेतकरी वेळीच काळजी घेत नसल्याने पीक किडीच्या आधीन होते. वेळेत उपाययोजना करायला नियोजन कमी पडत असल्याने उत्पन्नात मोठी तूट शक्य असते. यामुळे शेती ही धोक्याची व अधिक खर्चाची होत आहे.
शेतकरीवर्गाने वेळीच सावधगिरी बाळगत कृषी विभागाच्या सल्ल्याने पुरविलेल्या व्यवस्थापनांतर्गत नियोजन करावे. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, मंडल कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी पर्यवेक्षक अशोक जिभकाटे, मुकुंद खराबे, कृषी सहाय्यक शेखर निर्वाण, चुळामण नंदनवार, शरद नाकाडे, अरविंद धांडे, कृषिमित्र शरद निखाडे, प्रशांत जांभुळकर, नरेंद्र खंडाईत, गजानन हटवार, पवन हुमे, शेतकरी मित्र क्रिष्णा पराते, वीरेंद्र मदनकर, सुखराम मेश्राम, भाऊराव धकाते, गोकुळ राऊत, बळीराम बागडे, प्रभाकर कडूकार, भगवान शेंडे, यांनी केले आहे.
बॉक्स
शून्य खर्चात व नैसर्गिक उपायातील व्यवस्थापनात शेतकऱ्यांनी आरंभापासूनच नियोजन करावे. गराडीचा पाला बंधनात घालावा. हेक्टरी २० याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. शेतात पक्षी थांबे लावावे. ट्रायकोग्रामा जापोनिकम हे परजिवी कीटक हेक्टरी ५०,००० याप्रमाणे दर सात दिवसांनी तीन ते चार वेळा सोडावे. तसेच कृषी विभागातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रासायनिक कीडनाशक शिफारसीनुसार वापरावे. एकच कीडनाशक वारंवार वापरू नये. रोवणीनंतर महिनाभर अधिक पाणी भरून ठेवू नये. तसेच बांदान कोरडेसुद्धा नसावे. अर्थात पाण्याचे सुयोग्य नियोजन असावे. खताची मात्रा शिफारशीनुसारच पुरवाव्या. नत्राची मात्रा गरजेपेक्षा अधिक देऊ नये. वारंवार एका जमिनीत एकच पीक लावू नये.