रंजित चिंचखेडे
चुल्हाड (भंडारा) : बावनथडी नदीच्या पात्रातून मध्य प्रदेशातील माफियांनी रेतीचा उपसा सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत असणाऱ्या पात्रातून रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने काठावरील गावकऱ्यांना रेतीसाठी अन्य गावांत जावे लागत आहे. रेतीमाफियांनी नदीचे पात्र पोखरले असल्याने रेतीचे संकट निर्माण झाले आहे. या रेतीमाफियांना जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे अभय असल्याचे दिसून येत आहे. नदीपात्रातील सीमांकन प्रक्रिया करण्यात आली नाही.
बावनथडी नदीच्या पात्राने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेची विभागणी केली आहे. नदीच्या काठावर दोन्ही राज्यांतील गावांचे वास्तव्य आहे. या गावकऱ्यांना नदीचे पात्र जीवनदायी असून रेतीमाफियांचा शिरकाव सुरू झाल्याने गावकऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. बावणथडी नदीचे अर्धे अधिक पात्र महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असून या पात्रात काठावरील गावकऱ्यांच्या शेतजमिनी गिळंकृत झालेल्या आहेत.
एकट्या बपेरा गावातील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर आर बागायती शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. देवसरा, महालगाव, वरपिंडकेपार, सोंड्या गावांतील शेतकऱ्यांची शेतीसुद्धा नदीपात्रात आहे. या शेतीवर रेती असल्याने गावकऱ्यांनी डोक्यावर हात ठेवले आहे. रेतीचा उपसा करण्यासाठी मध्य प्रदेशातील माफियांनी नवी शक्कल लढविली आहे.
महसूल विभागाची चुप्पी
मध्य प्रदेशातील रॉयल्टीवर महाराष्ट्राच्या हद्दीतून रेतीचा उपसा करण्यात येत आहे. चिंचोली व डोंगऱ्या गावांच्या हद्दीत रेतीचा डंफिंग यार्ड तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या हद्दीतून चोरण्यात आलेली रेती त्याच राज्यातील नागरिकांना विक्री केली जात आहे. यात मध्य प्रदेशातील रेतीमाफिया मालामाल होत आहे. जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने अभय दिल्याशिवाय हे शक्य नाही. नदीपात्रातून खुलेआम रेतीचा उपसा सुरू असताना महसूल प्रशासन ब्र काढत नाही. मार्च एंडिंगच्या नावावर ट्रॅक्टरचालकांना टार्गेट करणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मध्य प्रदेशातील रेतीमाफिया दिसत नसल्याने परिसरातील नागरिकांनी भुवया उंचावल्या आहेत. यात साटेलोटे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.