भंडारा : पिढ्यानपिढ्या गावोगावी जाऊन लोकांना भाकीत व भविष्य सांगणारा नाथजोगी समाज आजही विकासाच्या प्रवाहात सामील झालेला नाही. लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी हद्दीत येणारा नाथजोगी समाज वस्तीतील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लाखांदूर तालुका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यात लाखनी तालुक्यातील खराशी येतील शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचाही मोलाचा हात दिला आहे.
पिढ्यानपिढ्या लोकांचे भाकीत सांगून नाथजोगी मंडळी आपला उदरनिर्वाह करतात. परंतु विज्ञानवादी युगात रूढी व परंपरांना घेऊन चालणाऱ्या या समाजात अज्ञानतेचा पाया रोवला गेला आहे.
शासनाच्या विविध योजना त्यांच्या दारापर्यंत नेऊन व माहिती सांगूनही ते विकासाच्या प्रवाहात सामील होत नाही, हीच खरी शोकांतिका प्रशासनापुढे आहे. याआधीही जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी स्वतः पुढाकार घेत नाथजोगीच्या वस्तीत जाऊन जनप्रबोधन केले होते. आताही तसाच काहीसा प्रयत्न लाखांदूर येत आहे. लाखांदूरचे तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांनी याबाबत दखल घेतली.
खराशी येथील शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष डमदेव कहालकर यांनी तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांच्याशी भेट घेऊन नाथजोगी समाजातील लोकांमध्ये समाजप्रबोधनाचे कार्य करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे विनंती केली. या विनंतीला मान देत तहसीलदार मेश्राम यांनी सदर वस्तीत शिक्षण, आरोग्य, सामाजिक यासह अन्य उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासित केले. या मुख्य प्रेरणेने संस्थेचे काही पदाधिकारी वस्तीत जाऊन त्यांना प्रबोधनात्मक माहिती दिली. मात्र नाथजोगी समाजातील मंडळींनी याला चक्क नकार दिला. नागरिकांनी सहकार्य दिले नाही म्हणून आम्ही कुठेही खचून जाणार नाही, अशी भावना ही शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेचे पदाधिकारी व उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
बॉक्स
अशी मिळाली सर्वांची मदत
नाथजोगी समाज वस्तीत जाऊन प्रबोधन करण्यासाठी शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला. यासोबतच खराशी येथील सामाजिक कार्यकर्ता योगेश झलके यांनी नाथजोगी वस्तीतील प्रत्येक कुटुंबाला पाच किलो तांदूळ देण्याची तयारी केली. याशिवाय तावशी येथील माजी सरपंच रमेश फुंडे, खराशी येथील सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज मेश्राम, आशा वर्कर मनीषा शेंडे, संस्थेच्या विश्वस्त मीरा डमदेव कहालकर यांनीही मदत देऊ केली.