लाखनी: येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे निसर्गमित्र व सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे, तसेच मनीष बावनकुळे यांना एक जखमी वानर समर्थ क्रीडांगणावर मरणासन्न अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच हे दोघेही तत्काळ क्रीडांगणावर धावून गेले. सहा महिन्यांच्या असलेल्या वानराच्या या पिल्लावर गावातील एका कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. यात १५ दिवासांच्या शुश्रूषेनंतर जखमी वानर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वानराच्या छातीच्या बरगड्या हल्ल्यामुळे एक दोन ठिकाणी तुटल्या होत्या. फुफ्फुसच्या इतर भागाला गंभीर जखमा झाल्या होत्या. विवेक व मनीष बावनकुळे यांनी ग्रीनफ्रेंड्सचे संघटक अशोक गायधने यांना कळविले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार विवेकने निसर्गमित्र पंकज भिवगडे, आरिफ बेग, तसेच सलाम बेग यांना मदतीकरिता बोलाविले. सर्वजण हया वानराला वनकार्यालय लाखनी येथे घेऊन गेले.
त्यानंतर ग्रीनफ्रेंड्सच्या निसर्गमित्रांनी जखमी वानराला पशुवैद्यकिय चिकित्सालय येथे नेण्यात आले. पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ. गुणवंत भडके यांनी तपासणी व प्राथमिक उपचारानंतर मुका मार जास्त असल्याने शस्त्रक्रिया करावे लागेल असे सांगितले. दोन दिवसाने शस्त्रक्रिया आटोपल्यावर याचा धोका अजून टळला नाही, टाके अद्याप सुकले नसल्याने हा वानर किमान १५ दिवस देखरेखीखाली ठेवून काळजी घ्यावी लागेल, असा सल्ला दिला. त्यावर विवेक बावनकुळे व मनीष बावनकुळे ह्या दोघांनी १५ दिवस ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने, पंकज भिवगडे यांच्या सूचनेनुसार आपल्या घरी संपूर्ण शुश्रूषा व काळजी घेतली.
त्यानंतर विवेक व मनीषने पूर्णपणे तंदुरुस्त झालेल्या या वानराला लाखनी वनक्षेत्र कार्यालयाचे राऊंड ऑफिसर डी. के. राऊत, फॉरेस्ट गार्ड एम. एल. शहारे, वनकर्मचारी आर. यू. सय्यद यांच्या उपस्थितीत नजीकच्या गडेगाव जंगलात सोडून देण्यात आले.
310821\img-20210831-wa0073.jpg
photo