लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पंखाचे हाड तुटलेल्या एका जखमी मोरावर भंडारा येथील मानवी अस्थी शल्य चिकित्सक आणि पशु चिकित्सकांनी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून पंखांमध्ये चेतना आल्यानंतर या मोराने पंखाची हालचाल केली.अड्याळ वनपरिक्षेत्रातंर्गत येणाºया पळसगाव देवरी परिसरात एक मादी मोर जखमी अवस्थेत पडलेला एका नागरिकाला दिसला. त्यांनी याची माहिती बीटरक्षक एच.डी. मुसळे यांना सांगितली. त्यांनी अड्याळचे वनपरिक्षेत्राधिकारी बेलखोडे यांना ही माहिती देताच ते कर्मचाºयांना सोबत घेऊन जखमी मोराला उचलले आणि किटाळी, पालांदूर अड्याळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले. तिथे परंतु उपचार होऊ न शकल्यामुळे मानेगाव येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात दुपारच्या सुमारास घेऊन गेले.तिथे पशुधन विकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांनी मोराची तपासणी केली असता मोराच्या उजव्या पंखाचा ट्युबरस नामक हाड खांद्यापासून तुटलेला होता. त्या हाडाचे तुकडे झाले होते. झाडाची फांदी या मोराच्या पंखावर पडल्यामुळे पंखाचे हाड तुटल्याचे तपासणीअंती दिसून आले. त्यानंतर या मोरावर शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी सुविधा मानेगाव येथे उपलब्ध नसल्यामुळे डॉ.भडके यांनी भंडारा येथील डॉ.दिनेश कुथे यांच्याशी संपर्क साधून शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. डॉ.दिनेश कुथे यांच्यासाठी हा प्रसंग नवीन होता.मानवी अस्थी शल्य चिकित्सक डॉ.दिनेश कुथे व पशुचिकित्सक डॉ.भडके यांनी मिळून या मोरावर शस्त्रक्रिया केली. डॉ.दिनेश कुथे यांनी मानवी शरीरात तुकडे पडलेल्या हाडात ज्याप्रमाणे रॉड टाकतात, त्याप्रमाणे या मोराच्या तुटलेल्या उजव्या पंखामध्ये रॉड टाकला.काही वेळातच त्या पंखामध्ये चेतना येऊन पंखाची हालचाल सुरू झाली. हा रॉड काही दिवस पंखामध्ये राहील. त्यानंतर या मोराला मुक्त विहारासाठी जंगलात सोडण्यात येईल, असे डॉ.भडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जखमी मोरावर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:28 AM
पंखाचे हाड तुटलेल्या एका जखमी मोरावर भंडारा येथील मानवी अस्थी शल्य चिकित्सक आणि पशु चिकित्सकांनी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून पंखांमध्ये चेतना आल्यानंतर या मोराने पंखाची हालचाल केली.
ठळक मुद्देभंडाऱ्यातील घटना : मानवी हाडाप्रमाणे रॉड टाकून जोडले हाड