घरकूल लाभार्थी यादी : ललीत बोंद्रे यांचा इशाराभंडारा : अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. प्रत्येकाला राहण्यासाठी घर असावे असा मानस शासनाचा आहे. असे असतानाही तालुक्यातील घरकुल लाभार्थी यादी बनविताना घोळ करण्यात आला. त्यामुळे इतर मागासवर्गीयांवर अन्याय झाला असून तो खपवून घेणार नसल्याचा इशारा भंडारा पंचायत समितीचे उपसभापती ललीत बोंद्रे यांनी दिला आहे. जिल्ह्यातील चालू वर्षात घरकुल मंजूर झालेले आहे. यात अनुसूचित जाती, जमातीकरिता सन २०११ च्या जनगणनेची यादी ग्राह्य धरण्यात आली. त्या यादीनुसारच घरकुल यादी मंजूर करण्यात आली आहे. एकीकडे शासनाने समाजातील दुर्बल घटकांना पक्के घर मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. घरकुल मंजूर करून नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु घरकुल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक असून तो न घेताच यादी मंजूर केल्याचा आरोप ललीत बोंद्रे यांनी केला आहे. त्यामुळे या यादीत नक्कीच घोळ झाल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दिपक सावंत यांना निवेदन दिले आहे. इतर प्रवर्गातील नागरिकांना मिळणाऱ्या घरकुल व्यतिरिक्त इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या लक्षात घेता घरकुल मंजूर झाल्याचे प्रमाण अल्प असल्यामुळे इतर मागासवर्गीयांवर हा अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी लावला आहे. २०११ च्या जनगणनेचा आधार घेत घरकुल यादी मंजूर केली असून ती चुकीची असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ज्यावेळी जनगणना झाली त्यावेळी जातीविषयक सर्वे करीत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली होती. मात्र त्यावेळी घरकुलांचा सर्व्हे करून लाभार्थ्यांना योजनांपासून वंचित ठेवण्याचा घाट रचण्यात आला. सोबतच गावातील स्थानिक मजूरवर्ग हा दिवसा रोजगारासाठी बाहेर गेल्यावर सर्व्हे झाले. घरकुल यादीत नाव आले नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीयांवर झालेला आरोप खपवून घेणार नसल्याचे शिवसेना तालुका प्रमुख तथा भंडारा पंचायत समितीचे उपसभापती ललीत बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने केलेल्या निवेदनातून म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)
इतर मागासवर्गियांवरील अन्याय खपवून घेणार नाही
By admin | Published: November 01, 2016 12:37 AM