पिंपळगाव (नि.) येथे घरकुल योजना राबविली जात आहे. पंतप्रधान घरकुल योजना राबविताना लाभार्थी यांच्या नावे मालकीची जागा असणे आवश्यक आहे. परंतु, असे नसतानाही घरकुल देण्यासाठी मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. विनायक लहू जिभकाटे यांनी हेमराज किसन बावने यांच्या घराला लागून असलेली सरकारी रिकामी जागा आपल्या वहिवाटीत घेऊन त्याचा नमुना ८ अ ग्रामपंचायत सचिव यांच्याकडून बनवून घेतला. यासाठी मोठा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.
सरकारी जागा ज्या व्यक्तीस मिळते ती विकता येत नाही. तरीदेखील सरकारी जागा विनायक जिभकाटे यांचे नावे कशी केली, असा प्रश्न अनेक गावकरी विचारत आहेत. घरकुल बांधकाम विनायक जिभकाटे यांनी सुरू केले. एवढ्यावर न थांबता शेजारील हेमराज किसन बावने यांच्या मालकी हक्क असलेल्या जागेत घरकुल बांधकाम आणले असून, विनायक जिभकाटे हाच हेमराज बावने यांना अरेरावी करीत जिवे मारण्याची धमकी देत आहे. या सर्व प्रकरणात ग्रामपंचायत सचिव हेच जबाबदार आहेत, असा आरोप हेमराज बावने यांनी केला आहे. सरकारी जागेवर घरकुल बांधकाम करण्याची रीतसर परवानगी देऊन मोठा आर्थिक व्यवहार सचिव यांनी करून महत्त्वाचा दस्तऐवज नमुना ८ अ तयार करून देणाऱ्या सचिवावर कारवाई करण्यात यावी यासाठी खंड विकास अधिकारी पंचायत समिती, पवनी यांना लेखी तक्रार केली आहे. दहा दिवस होऊनही या प्रकरणाची साधी चौकशी केलेली नाही. याबद्दल गावात आश्चर्य व्यक्त होत आहे. तरी सरकारी जागेवर घरकुल बांधण्यास प्रोत्साहन देणाऱ्या व सरकारी जागेचा खोटा नमुना ८ अ देणाऱ्या सचिवांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हेमराज बावने यांनी लेखी तक्रारीतून केली आहे. तसेच सरकारी जागेवर सुरू असलेले घरकुल बांधकाम थांंबविण्याची मागणी केली आहे.
कोट
कोट
माझ्याकडे पिंपळगाव व अड्याळ या दोन गावांचा पदभार आहे. त्यामुळे या प्रकरणाची मला माहिती नाही. मी यात कोणताही गैरप्रकार केलेला नाही. जी. एस. मोहाड,
सचिव ग्रामपंचायत पिंपळगाव (निपाणी)