सिहोरा परिसरातील गावात प्रधानमंत्री घरकूल योजना, रमाई घरकूल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकूल योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. गत तीन वर्षांपासून घरकूल योजना मंजुरीनंतरही पूर्णत्वास गेलेल्या नाहीत. लाभार्थ्यांनी घरकूल अनुदानाचे राशी हडपल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. घरकूल मंजुरी झाल्यानंतर लाभार्थ्यांना प्रथम टप्प्यात अनुदान राशी साहित्य खरेदी करण्यासाठी देण्यात आली आहे. या राशीमधून घरकूल बांधकामाची सुरुवात करण्यात येत आहे. परंतु लाभार्थ्यांना प्रथम टप्प्यातील अनुदान राशी मिळाल्यानंतरही गत तीन वर्षांपासून घरकुलांचे बांधकाम सुरु करण्यात आले नाहीत. गावातून लाभार्थ्यांसह घरकूल बेपत्ता झालेल्या आहेत. याशिवाय अनेक घरकुलांचे बांधकाम अर्धवट आहेत. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून घरकूल बांधकाम पूर्ण झाले नसताना पंचायत समिती स्तरावरुन चौकशी सुरू करण्यात आली नाही. यामुळे लाभार्थ्यांत भीती नाही. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामसेवक घरकुलांची मौका चौकशी करीत नाहीत. घरकूल लाभार्थ्यांना फाउंडेशन, सज्जा, पूर्ण बांधकाम असे प्रमाणपत्र देत आहेत. यानंतर या प्रमाणपत्राचे आधारावर अनुदान उपलब्ध करण्यात येत आहे. सरपंच सुद्धा मताचे राजकारण करीत असल्याने डोळे बंद करून प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करीत असल्याने आलबेल करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून अर्धवट असणाऱ्या लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत नाहीत. यामुळे घरकूल योजनेचे लचके खुद्द लाभार्थ्यांनी तोडले आहेत. सिहोरा परिसरात एक नव्हे अनेक घरकुलांचे बांधकामात भोंगळ कारभार झालेला आहे. परंतु चौकशी व फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला नाही. चांदपूर गावात झिंगर धानु सोनवणे यांना घरकूल मंजूर झाली आहे. त्यांचे नावे घर क्रमांक ११५ असा आहे. या शिवाय त्यांचे वारसदाराचे स्वतंत्र फ्लॉट आहेत. दोन्ही वारसदारांना स्वतंत्र घरकूल प्राप्त झाले आहेत. त्यांनी घरकुलाचे बांधकाम केले आहेत. परंतु मृतक झिंगर धानु सोनवणे यांचे नावे मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम आजवर झाले नाही. प्रत्यक्षात झिंगर सोनवणे यांचे नावे असणारी जागा रिकामीच आहे. परंतु त्यांचे नावाने मंजूर झालेल्या घरकूल अनुदान उचल करण्यात आले आहे. घरकूल अनुदान राशीत घोळचघोळ करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. परंतु पंचायत समिती स्तरावरुन उच्चस्तरीय चौकशी करता निर्देश देण्यात येत नाहीत. दरम्यान ज्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले नाहीत, अशा लाभार्थ्यांकडून अनुदान राशी वसूल करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. यामुळे कुंपणच शेत खात असल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते यांनी केला आहे. या संदर्भात अधिक माहिती करता गटविकास अधिकारी धीरज पाटील यांना संपर्क साधले असता होऊ शकला नाही.
घरकुलाचे अनुदान हडपल्या प्रकारणाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:40 AM