हिरवे धान झाले पिवळे : उसर्रा परिसरातील शेतकरी हवालदिल
विलास बन्सोड
उसर्रा : उसर्रा परिसरात सध्या धानपिकावर करपा व इतर रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे चित्र सर्वंदूर दिसत आहे. मोहाडी तालुक्यातील उसर्रा, सालई (खुर्द), काटेबाम्हणी, टाकला, धोप, टांगा, ताडगाव, बपेरा, आंबागड आदी गावांतील धानपिके किडीच्या प्रादुर्भावाने त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्याचे हिरवे धान पिवळे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे.
मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतात उभे असलेल्या धान पिकाकडे शेतकरी आता पाठ फ़िरवू लागला आहे. पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांनी वित्तीय संस्था, बँक व खासगी सावकाराकडून कर्ज काढून धानाची लागवड केली. यंदा उशिरा वरुणराजाचे आगमन झाले. त्यातच मधात पाऊस नसल्याने, पाहिजे तेवढे पोषक वातावरण मिळाले नाही. परिणामत: रोगाचा प्रादुर्भाव वाढला व हिरवे धान पिवळे पडू लागले. शेतकऱ्यांनी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागड्या कीटकनाशकाचा वापर केला, पण याचा फायदा झाला नाही.
मागील वर्षी धानपिकाला उतारा मिळू शकला नाही. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. यंदा रोगामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे कृषी विभाग मात्र निद्रावस्थेत असल्याचे दिसत आहे. कृषी मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी कर्मचारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून होत आहे. राज्य शासनाने याकडे लक्ष द्यावा व शासकीय सर्वेक्षण करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी उसर्रा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.