तुमसर: केंद्रीय अन्वेशन विभाग आणि राज्य सतर्कता विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तालुक्यातील डाेंगरी बुजरुक येथील माॅयल खाणीतील मॅग्निज साठ्याची तपासणी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. देशातील ३०० केंद्रीय उद्याेग व कार्यालयांची तपासणी सुमारे २५ राज्यात करण्यात आली. त्यात तुमसर तालुक्यातील डाेंगरी बु. येथील खाणीचाही समावेश आहे.
तुमसर तालुक्यातील डोंगरी बुज. येथे ब्रिटिशकालिन मॅग्नीज खाण आहे. ही खाण जगप्रसिध्द असून केंद्र सरकारला दरवर्षी मोठा महसूल मिळवून देते. शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभाग व राज्य सतर्कता विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक डाेंगरी येथील खाणीमध्ये दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे तपासणी केली. संयुक्तरित्या मॅग्निज साठ्याची तपासणी केल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांचे पथक आल्यानंतर खाण परिसरात एकच खळबळ माजली. तपासणीची चर्चा परिसरात सुरू आहे.
शुक्रवारी संपूर्ण देशात एकाच वेळी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रकल्प उद्योग व कार्यालयांची झाडा-झडती केंद्रीय पथकाने घेतली. त्या अनुषंगाने डोंगरी येथील केंद्र सरकारच्या मॅग्निज खाणीमध्ये तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग नियमाप्रमाणे अशी तपासणी करीत असते अशी माहिती आहे. आकस्मिक तपासणीमुळे संबंधित कार्यालय व उद्योगांना सतर्क राहून येथे कामे करावे लागतात. केंद्र सरकार विविध विभागांची तपासणी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला देते अशी माहिती आहे.