लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा शहरातील पाणी समस्या मिटून, लोकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी निर्माणाधीन असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा बुधवारी नगराध्यक्ष खासदार सुनील मेंढे यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला.
या योेजनेत विविध अडचणी जाणून घेत त्यावर मात करण्याच्यादृष्टीने निर्देशही दिले. सदर योजनेचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून पाच महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वर्षानुवर्षांपासून भंडारेकरांना पाणीपुरवठा करणारी योजना जुनी झाल्याने अनेक अडचणींना नागरिकांना तोंड द्यावे लागत होते. शहराचा विस्तार आणि अन्य गोष्टींमुळे ही पाणीपुरवठा योजना लोकांची गरज भागविण्यासाठी अपुरी ठरत होती. अशावेळी नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी आल्यानंतर खा. सुनील मेंढे यांनी भंडारा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. ५६ कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेत पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही केली.
या माध्यमातून भंडाराकरांना २४ तास शुद्ध मुबलक पाणी देण्याचा मानस आहे. शहराच्या पाच भागांमध्ये नवीन टाक्या या योजनेच्या माध्यमातून बांधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सुरू झालेल्या कामाची आज नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी पाहणी केली. दसरा मैदानावर सुरू असलेल्या टाकी बांधकामाचे अवलोकन करून, लक्षात आलेल्या उणिवांची जाणीव त्यांनी करून दिली. आपल्या तांत्रिक अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याच्यादृष्टीने योग्य ते उपाय करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. कामाचा दर्जा चांगला राहावा आणि त्याचे आयुष्य वाढावे यासाठी प्रामाणिकपणे काम करा, असेही त्यांनी सांगितले. वेळेत काम पूर्ण करून भंडारेकरांना लवकरात लवकर शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
दसरा मैदानावरील कामासोबतच वैनगंगा नदीकाठावर, एमएसईबी कॉलोनी, यशोदानगर, तसेच इतर ठिकाणी सुरू असलेल्या पाईपलाईन कामाठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत मुख्याधिकारी विनोद जाधव, नगरसेवक आशु गोंडाने, वनिताताई कुथे, दिनेश भुरे, रजनीश मिश्रा, कैलास तांडेकर, मिलिंद मदनकर, मनोज बोरकर, अजीज शेख, पप्पू भोपे, कुणाल न्यायखोर, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंता दिनेश तुरकर, शाखा अभियंता ओमप्रकाश बोन्द्रे आदी उपस्थित होते.