विक्रमी उत्पादन : अन्य शेतकऱ्यांपुढे प्रस्तुत केले उदाहरण, खोलमारा येथील प्रकारबारव्हा : लाखांदूर तालुक्यातील खोलमारा (जुना) येथील अल्पभूधारक शेतकरी अम्रृत मदनकर या शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने कमी जागेत आणि कमी खर्चात शेती करून आंतरपिकाची ०.६१ आर (दीड एकर) जागेत विविध पिकांची लागवड केली. यात विक्रमी उत्पादन घेऊन शेती व्यवसाय करणे परवडण्यासारखे आहे, हे दाखवून दिले. या आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येत असलेल्या पिकाची पाहणी करण्याकरिता जिल्हा कृषी विभागाच्या चमूने भेट देऊन आंतरपिकाची प्रत्यक्ष पाहणी केली.हवामानानुसार कोणत्या पिकाची निवड व केव्हा लागवड कोणत्या पद्धतीने करायची याची जाणीव ठेवून पिकांची लागवड केल्यास नक्कीच शेती केल्यास अधिकाधिक उत्पादन घेऊन आर्थिक समृद्धी साधता येते असे ठाम मत अम्रृत मदनकर या शेतकऱ्याने व्यक्त केली. जून २०१४ मध्ये मदनकर या शेतकऱ्याने ०.६१ आर या अल्पशा जागेत चवळा, फुलकोबी, काकडी, वालशेंग, कारले आदी पिकाची आंतरपिक या पद्धतीने लागवड केली. आजपर्यंत शेतातून २० टन ९९३ किलोग्रॅम उत्पादन घेतले आहे. आणखी दोन टन भाजीपाला पिक निघल्याची अपेक्षा आहे. सदर पिकाच्या लागवडीकरिता आजपर्यंत १ लक्ष ६० हजार रुपये इतका खर्च आले असून २ लक्ष ४० हजार रुपयाचा निव्वळ नफा मिळविला आहे. असे एकूण ४ लक्ष रुपये मिळकत मिळाली आहे. आणखी १ लक्ष रुपयाचे उत्पन्न निघण्याची आशा आहे. असे एकूण ५ लक्ष रुपयाचे उत्पन्न काढण्याचे त्यांचे उद्दीष्ट आहे.शेतातील आंतरपिक पाहून चमूने शेतकऱ्यांचे कौतूक केले. सदर पिकाची लागवड ही तालुका कृषी अधिकारी गेडाम, पांडे व रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असल्याचे शेतकरी मदनकर यांनी सांगितले. सदर पिकाची प्रत्यक्ष पाहणी करीत असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.भोयर, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रज्ञा गोडघाटे भंडारा, किटक शास्त्रज्ञ चौधरी, साकोली येथील उपविभागीय कृषी अधिकारी शेवाडे, जिल्ह्यातील मोहाडी, पवनी, साकोली, लाखनी, लाखांदूर, कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
अधिकाऱ्यांनी केली आंतरपिकाची पाहणी
By admin | Published: January 04, 2016 12:38 AM