भंडारा : माेहाडी तालुक्यातील टाकलाचा एक तरुण सवयीप्रमाणे उसर्राच्या हातभट्टीच्या ठेक्यावर गेला. दारुविक्रेत्याला एक ग्लास दारु माेठ्या ऐटीत मागितली. आधीच दारुची उधारी अंगावर असल्याने विक्रेत्याचे डाेके ठणकले. पहिले दारुच्या उधारीचे पैसे दे नंतरच दारु पी, असे ठणकावून सांगितले. दारु देत नाही म्हणजे काय? तरुणही चांगलाच भडकला. ताेंडाताेंडी वाद वाढत गेला. दारु विक्रेत्याने बाजूला उभ्या असलेल्या बैलबंडीची उभारी काढली आणि तरुणाच्या डाेक्यात हाणली. डाेक्यातून भळभळा रक्त वाहायला लागले. दारु तर मिळाली नाही मात्र उभारीचा प्रसाद मिळाला. माेहाडी तालुक्यातील उसर्रा येथे बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या घडलेल्या या घटनेची तक्रार आंधळगाव पाेलीस ठाण्यात देण्यात आली. दीनदयाल मनाेहर भाेयर (२८) या तरुणाच्या तक्रारीवरुन पाेलिसांनी आता दारु विक्रेत्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला. सध्या परिसरात दारु ऐवजी मिळाला उभारीचा मार अशी चर्चा रंगत आहे.
दारु ऐवजी मिळाला उभारीचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:23 AM