रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये धान खरेदी १ मे ते ३० जून या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले होते. १ मे पासून धान खरेदी सुरु होणे अपेक्षित होते; मात्र खरिपातील धानाची उचल न झाल्याने गोदाम हाऊसफुल्ल होते. रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेला धान कुठे ठेवावा असा प्रश्न होता. त्यातच राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने १९ मे रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकाच्या माध्यमातून उघड्यावर धान खरेदी होणार नाही असे निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी गोदामाअभावी रखडली होती.
शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात येताच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी थेट व पत्रव्यवहाराच्या माध्यमातून धान खरेदीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. तसेच शासकीय संस्थांच्या रिकाम्या इमारतीचा उपयोग धान्य साठवणुकीसाठी करावा असा सल्लाही दिला. खासदार पटेल यांच्या सूचनेवरुन परिपत्रक निर्गमित करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील धान खरेदीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
बाॅक्स
आश्रमशाळा, क्रीडा संकुलाच्या इमारतीचा उपयोग
अन्न व नागरी पुरवठा विभागाने परिपत्रक निर्गमित केले असून पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास आश्रमशाळा, क्रीडासंकुल, वापरात नसलेल्या पाटबंधारे विभागाच्या इमारती, सार्वजनिक बांधकाम अथवा अन्य शासकीय संस्थांच्या इमारती व गोदामे अधिग्रहित करुन साठवणूक व्यवस्था करावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.