कार्यरत विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समितीच्या वतीने अनेकदा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली. मात्र या मागण्यांच्या दृष्टीने निर्णय घेतला गेला नाही. जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढावी, आश्वासित प्रगती योजनेची प्रकरणे निकाली काढावी, सर्वसाधारण बदली अंतर्गत प्रशासकीय व विनंती बदल्यांमध्ये झालेला घोळ दूर करावा, यासह अनेक मागण्यांना घेऊन ही निवेदने देण्यात आली होती. जिल्हा परिषद प्रशासन सकारात्मक दिसत नसल्याचे पाहून १३ ऑगस्ट रोजी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना २४ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देणारे पत्र देण्यात आले होते. याच मागण्यांना घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खा. सुनील मेंढे यांची भेट घेतली. समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रशासनाला सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, ताबडतोब जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मागण्यांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्या, असे निर्देश खासदारांनी दिले. या अनुषंगाने २३ ऑगस्ट रोजी खासदारांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह महत्त्वाची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. सकारात्मक तोडगा निघून या २७ तारखेपर्यंत मागण्या मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदारांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक दिवसांपासून रेंगाळत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली निघण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:37 AM