भंडारा तालुक्यातील गुंथारा येथे महाराष्ट्र शासन राज्य कृषी विभागांतर्गत तालुकास्तरीय क्षेत्रीय कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ कृषी अधिकारी होमराज धांडे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी साहाय्यक गिरीश रणदिवे, देवा जवंजाळ, मीनाक्षी लांडगे उपस्थित होते. डॉ. श्यामकुवर यांनी उन्हाळी धान लागवडीची पाहणी करून त्यावरील कीड रोग व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन केले.
उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेबाबत सखोल मार्गदर्शन केले.
भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी हरभरा पिकाचे दैनंदिन आहारातील महत्त्व व जमीन सुपीकतेच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी हरभरा पीक महत्त्वाचे असून कृषी विभागाच्या ठिबक, तुषार सिंचन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत राबवलेल्या योजना तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाजीपाला पिकाकडे लक्ष देऊन आपली आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन केले. पारंपरिक भात पिकाला अन्य पिकांचे पर्याय शोधण्याचेही त्यांनी आवाहन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी गटनिर्मिती व शासनाच्या विविध योजनांचा लाभ गटामार्फत कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. संचालन होमराज धांडे यांनी केले तर आभार मीनाक्षी लांडगे यांनी मानले.
बॉक्स
शेतीपूरक व्यवसायासाठी सर्वतोपरी सहकार्य
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतीशी निगडित शेतीपूरक व्यवसाय निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपन्यांतून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी भंडारा उपविभागातून कृषी आयुक्तालयाकडे ५ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. या प्रस्तावांची दखल घेत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी अन्य जिल्ह्यांतूनही असे शेतीपूरक उद्योग उभारणीचे प्रस्ताव मागविले असून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर व ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी हे उद्योग फायदेशीर ठरणार आहेत. कृषी आयुक्तांनी भंडारा जिल्हा कृषी विभागाचे कौतुक केले आहे.