पालांदूर
दिवसेंदिवस वाढत्या व्यवहारामुळे पालांदूर येथील बाजारपेठ फुलत चाललेली आहे. त्यामुळे मोठे वाहन चक्क गावातून मुख्य रस्त्यातून ये जा करतात. गावाला एकच रस्ता असल्याने त्यांनाही नाईलाज आहे. अशा कठीण प्रसंगी प्रस्तावित असलेला बहुप्रतिक्षित बायपास रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे.
गत अनेक वर्षापासून पालांदूर वासियांची बायपास मागणी शासन दरबारी पेंडिंग आहे. वारंवार येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत बायपासची आपबीती व्यक्त केलेली आहे. थेट जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात चेंडू टाकलेला आहे. मात्र अजूनही पालांदूर बायपास च्या कामाकरिता हिरवी झेंडी मिळालेली नाही.
गावात येण्याकरिता एकच रस्ता तोही अरुंद असल्याने वाहतुकीचे तीन-तेरा होत आहेत. जड वाहने याच रस्त्याने व्यापाऱ्यांचा माल दुकानात रिकामा करतात. अशावेळी उभ्या असलेल्या ट्रक ने इतर वाहतूक ची कोंडी होते. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्येला अंतिम रुप मिळावे. याकरिता प्रयत्नांची पराकाष्टा सुरूच आहे. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देत समाधानाची भूमिका सांगताहेत.
बायपासला सुमारे एक कोटी ३७ लक्ष रुपये मंजूर झाल्याचे यापूर्वी लोकप्रतिनिधी कडून सांगण्यात आले होते. परंतु सदर निधी हा कमी पडत असून त्यात पुन्हा वाढ करण्याची प्रक्रिया कार्यान्वित असल्याचे कळले. परंतु आता त्या विषयात प्रशासन स्तरावरून आशावादी चर्चा होत नसल्याने प्रकरण थंड अवस्थेत तर नाही ना! अशी चर्चा जोर धरत आहे.
डब्बा /चौकट
जिल्ह्याच्या बजेट कडे लक्ष
जिल्हा विकास निधी अंतर्गत पालांदूर ला विशेष निधीची अपेक्षा आहे. या बजेटमध्ये पालांदूर चे दोन्ही अंतर्गत रस्ते डांबरीकरण सह मजबुतीकरणाचे काम नियोजित करणे महत्त्वाचे आहे. या कामासोबतच बायपास ला लागणाऱ्या निधीची सुद्धा जिल्हा बजेटमधून वाढीव निधीची अपेक्षा आहे. तसेच दिघोरी ते पालांदूर या १० किलोमीटर दुय्यम विज वाहिनीचे काम सुद्धा या जिल्हा बजेट निधीतून नियोजित असल्याचे चर्चेत आहे. याकरिता विधानसभा अध्यक्ष यांनीसुद्धा प्रयत्न करावे. अशी अपेक्षा पालांदूर वासियांनी अपेक्षीली केली आहे.