लाखनी तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून पालांदूरला सन्मान आहे. शासन स्तरावरून लोकसंख्येच्या आधारावर योजना व निधीची तरतूद मिळते. परंतु गावातील अंतर्गत प्राथमिक सुविधांकडे अपेक्षित लक्ष पुरवत नसल्याने जनतेचा रोष पदाधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. गावच्या जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या मुख्य रस्त्याला डागडुजी वर्षातून एक-दोनदा केली जाते. मात्र, अंतर्गत रस्त्याकडे नागरिक सूचना देऊनही साधा मुरूम टाकण्याची भूमिका ग्रामपंचायत करीत नसल्याने रस्ते चिखलाचे अधीन झालेले आहेत.
गत आठ ते दहा दिवसांपासून गावातील ४० ते ५० पथदिवे बंद आहेत. सूचना देऊनही दिवे लावले जात नसल्याने अंधारात वावर करावा लागतो. पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू यांचे भय कायमस्वरूपी मनात असते. ग्रामपंचायतीने मोठी कामे केली नाहीत तरी चालेल, मात्र प्राथमिक स्तरावरची स्वतःच्या अधिकारातील कामे करणे नितांत आवश्यक आहे. गावातील अंतर्गत रस्त्यावर लहान-मोठे डबके तयार झालेले आहेत. यात डासांचा मुक्काम वाढलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
चौकट
पालांदूर व परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ आहे. ग्रामपंचायतीने स्वतः पुढाकार घेत गावातील अस्वच्छतेचे वातावरण दूर करीत आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. अंतर्गत रस्त्यात असलेले डबके, चिखल यावर वेळीच सुविधा पुरवीत सर्वसामान्यांना योग्य सेवा देणे अत्यावश्यक आहे. अंतर्गत रस्त्यांना गत तीन वर्षांपासून साधा मुरूमसुद्धा पडला नसल्याने रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. एकीकडे लाखो रुपयांच्या योजनेंतर्गत इमारती बांधल्या जातात. मात्र, रस्त्यावर साधा मुरूमही पडत नसल्याने स्थानिक प्रशासन टीकेचे धनी होत आहे.
कोट
अधिकृत गौण खनिजाची समस्या असल्याने मुरुमाची व्यवस्था करणे कठीण होत आहे. तरी मिळेल त्या ठिकाणाहून लवकरात लवकर व्यवस्थेचे नियोजन केले जाईल. पथदिवे यांना सेंसर लावल्याने काही ठिकाणचे दिवे बंद पडलेले आहेत. संबंधित यंत्रणेला विचारणा केलेली आहे. त्यांच्याकडून माहिती येताच तत्काळ पथदिव्यांची व्यवस्था केली जाईल.
पंकज रामटेके, सरपंच, पालांदूर