जिल्हाधिकारी कार्यालयाचे होणार नुतनीकरण : भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखांदूर व पवनीत तहसील कार्यालय ईमारतींचा समावेश इंद्रपाल कटकवार भंडारा जिल्हा प्रशासन गतीशिल करण्यासोबतच तालुका मुख्यालयही अद्ययावत व्हावे, या हेतूने जिल्हा प्रशासनाने पाच तहसील कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामाचा ४८ कोटी रूपयांचा प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी व लाखांदूर येथे तहसील कार्यालयाची नवीन इमारत व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नवीन वास्तूचे बांधकाम होणार आहे. जिल्हा प्रशासनासह ग्रामीण विकासाचा कणा ठरत असलेल्या तालुकास्तरावर तहसील कार्यालयांना अद्ययावत करण्याच्या दृष्टीकोणातून राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मागील तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालय आधुनिकीकरणाकडे वळले आहे. सद्यस्थितीत सन २०१८ पर्यंत राज्यातील ग्रामपंचायती संगणकीकृत करण्यासाठी शासनाने पाऊल उचलले असताना तालुका मुख्यालयी असलेल्या तहसील ईमारतीही अत्याधुकिन बनविण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहेत. याअंतर्गत जिल्हा प्रशासनाने लाखनी व साकोली तालुका वगळता अन्य पाच तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या इमारत बांधकामांसाठी प्रस्ताव सादर केला आहे. सद्यस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या मागील आवारात नवीन इमारतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. यात सर्वाधिक निधी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या वास्तू निर्मितीसाठी लावण्यात येत आहे. मंत्रालयातून मंजुरीची प्रतीक्षा जिल्हाधिकारी कार्यालय व पाच तहसील कार्यालय ईमारत बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाने ४८ कोटी रूपयांचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला आहे. सदर प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडून शासनास सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव जुना असला तरी यातील केवळ लाखांदूर तहसील कार्यालय ईमारत बांधकामाचा सुधारित प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ईमारत बांधकामासाठी १५ कोटी ८६ लाख रूपयांची रक्कम खर्च होण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय पवनी तहसील कार्यालयासाठी ५ कोटी ९८ लाख ६० हजार रुपये, तुमसर ७ कोटी ३२ लाख ५१ हजार, भंडारा ६ कोटी ७२ लाख २१ हजार, मोहाडी ४ कोटी ३ लाख तर लाखांदूर तहसील कार्यालय इमारत बांधकामासाठी १० कोटी ६० लाख रूपयांचा निधी प्रस्तावित आहे. लाखनी तहसील कार्यालय ईमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून साकोली येथे नवीन तहसील कार्यालय ईमारतीचे बांधकाम सुरु आहे. परिसर होणार सुसज्ज जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयांच्या नवीन इमारत बांधकामासाठी प्रस्ताव मंजूर झाल्यास सदर परिसर सुसज्ज होण्यास मदत होणार आहे. भंडारा येथे राष्ट्रीय महामार्गाला लागूनच तहसील कार्यालय आहे. येथे प्रशस्त जागा असून सर्वच विभागासाठी स्वतंत्र कार्यालय उभारता येऊ शकते. त्याला लागूनच सेतू केंद्राची निर्मिती झाल्यास नागरिकांच्या वेळेची बचत होऊ शकते.
नवीन शासकीय ईमारतींसाठी ४८ कोटींचा प्रस्ताव सादर
By admin | Published: January 04, 2017 12:38 AM