लोकमत न्यूज नेटवर्कनाकाडोंगरी : तुमसर-कटंगी राज्यमार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाल्याने अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे संबधिताचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.तुमसर - कटंगी राज्यमार्गावर नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असते. राज्यमार्गाला लागूनच असलेल्या चिखला, डोंगरी(बूज) व सीतासांवगी मॉइल असल्यामुळे त्यात आणखीच भर पडते, मोठ्या प्रमाणावर जड वाहन सतत ये -जा करीत असल्यामुळे या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात गोबरवाही रेल्वे स्थानकापासून तर नाकाडोंगरीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था दयनीय अवस्था झाली आहे, जागोजागी रस्त्याच्या मधोमध मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सुंदरटोला येथे भर चौकात रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडून त्यांना दुखापत झाली, असेच अपघात त्या खड्ड्याच्या ठिकाणी नेहमी होतच असतात. राजापूर - नाकाडोंगरी या दरम्यान असलेल्या पुलाच्या कडेला मोठा खड्डा पडला आहे. तो खड्डा दुरून दिसत नाही पण खड्ड्याच्या जवळ गेल्यावरच तो दिसतो. तो पर्यंत खूप वेळ निघून गेलेली असते. अचानक एवढा मोठा खड्डा पाहून गाडी चालक भांबावतो. वाहणावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होत आहे. अपघातात वाहन चालकास आपला जीवही गमवावा लागू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता बांधकाम व दुरुस्तीसंबधी बांधकाम विभागाचे नेहमीच दुर्लक्ष केली जात आहे. यापुर्वी खड्ड्यांची डागडूजी करण्यात आली. मात्र महिन्याभरात रस्त्याची पुन्हा दयनीय अवस्था झाली आहे. संबंधीत विभागाने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
तुमसर - कटंगी राज्यमार्गावरील खड्डे देताहेत अपघातांना आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 9:31 PM
तुमसर-कटंगी राज्यमार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाल्याने अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे संबधिताचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : किरकोळ अपघातांची मालीका सुरुच, नागरिकांमध्ये संताप