गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : तुमसर येथे आयपीएल सट्टा सुरू असल्याच्या चर्चेला अखेर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बळ मिळाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी या केंद्रावर धाड घालून १ लाख २५ हजार ३५८ रुपयांचे साहित्य जप्त केले. यात तिघांना अटक करण्यात आली असून एक जण पसार होण्यात यशस्वी झाला.
संजय हंसराज साठवणे (३०), वीरेंद्र भाविक कठाने (३३, दोघेही राहणार गोवर्धन नगर तुमसर) आणि धर्मेंद्र श्यामलाल बनकर (२१, उमरवाडा) अशी अटकेतील आरोपींची नावे असून चक्रेश कुमार उर्फ बाल्या बिसणे असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीवर कलम ४,५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १०९ भांदवि अंतर्गत तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांनी ही धाडसी कारवाई केली. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास शहर वार्ड परिसरात नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात या पथकाने धाड घातली. यावेळी संजय साठवणे, वीरेंद्र कठाणे व धर्मेंद्र बनकर हे चक्रेश कुमारच्या मदतीने व सांगण्यावरून आयपीएल सामन्यावर पैशाची बाजी लावून लोकांकडून पैसे घेऊन मोबाईलवरून आकडे उतरवून जुगार खेळताना मिळून आले. या कारवाईत आरोपींकडून एक लाख २५ हजार ३५८ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कनेक्शन गोंदिया-रायपूरशीतुमसर शहरात मागील काही दिवसापासून आयपीएल वर मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांनी कारवाई करून प्रकार उघड केलाच. तुमसरमधील या आयपीएल जुगाराचे कनक्शन नागपूर गोंदिया व रायपूरशी जुळून असल्याची माहिती आहे. यात आतापर्यंत अनेक तरुणांचे लाखो रुपये बुडाल्याचे समजते.