तुमसर : सिहोरा परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा नियमित होत नसल्याने धान पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. चार दिवस आठ तास व रात्री बारानंतर दहा तास असे तीन दिवस वीज पुरवठा सुरू आहे. रात्री शेतात कसे जावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
मागील खरीप हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले होते. ते नुकसान भरून काढण्याकरता या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांना चांदपूर जलाशयातून पाणी सिंचनाकरिता मिळत आहे. तर अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील विहिरीतून धानाला पाणी द्यावे लागते. परंतु कृषी पंपांना वीज वितरण कंपनीकडून नियमित वीज पुरवठा होत नाही. एका आठवड्यातून चार दिवस दिवसा केवळ आठ तास तर तीन दिवस रात्री १२ नंतर वीज पुरवठा केला जातो. रात्री शेतावर वीज पुरवठा करण्याकरता कसे जावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यासंदर्भात पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.