भंडारा : कडक उन्हाळामुळे भेगाळलेल्या शेतीला सिंचनासाठी कृषी वीज वाहिन्यांवर आकोडा टाकून मोटारपंपास विद्युत पुरवठा सुरू करण्याच्या प्रयत्नातील एका शेतकऱ्यास विद्युतचा जोरदार धक्का लागला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी गुरूवारला सकाळी ७:३० वाजताचे दरम्यान साकोली तालुक्यातील चांदोरी शेतशिवारात घडली. मृतक शेतकऱ्याचे नाव रामकृष्ण तुळशिराम शेंदरे (७२, रा, पळसपाणी चांदोरी), असे आहे.
मृतक रामकृष्ण शेंदरे हा अल्पभूधारक शेतकरी आहे. आठवडाभरापासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतशिवार भेगाळले आहेत. कोमेजलेल्या पिकांना सिचंनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे लक्षात येताच रामकृष्ण सकाळच्या दरम्यान घरून शेतशिवारात गेला. मोटारपंप सुरू करण्यासाठी त्याने शेजाजवळून जाणाऱ्या कृषी वीज वाहिनीवर आकोडा टाकला. मात्र, आकाडा टाकल्यानंतर मोटार सुरू करण्याच्या प्रयत्नात त्याचा स्पर्श जीवंत तारास झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती होताच साकोली ठाण्याचे पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर शव उत्तरीय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. मृतकाचे मागे पत्नी, तीन मुले, सूना व नातवंडे, असा आप्त परिवार आहे.