तुमसर येथील प्रकार : विम्याअभावी मदत मिळणार नाहीतुमसर : स्थानिक गांधी नगर येथे हादरवून सोडणारा स्फोट हा सिलिंडरचाच असल्याचा निष्कर्ष एच.पी.सी.एल. कंपनीने दिला आहे. त्यामुळे हा स्फोट नेमका कशामुळे झाला होता अशा शंकाकुशंकांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र स्फोटात मृतकाला व जखमींना कोणतीही आर्थिक मदत देय होत नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे मदतीची मागणी होऊ लागली आले. दि.४ जुलै रोजी रवींद्र नागपुरे यांच्या घरातील स्वयंपाक खोलीत सायंकाळच्या सुमारास स्फोट झाला होता. यात घराचे स्लॅब कोसळून शेजारील मुरारी पिथोडे यांचा मलब्याखाली दबून जागीच मृत्यू झाला होता. या स्फोटाच्या तीव्रतेने दीड किमी परिसरातील नागरिकांना हादरे बसल्याने आणि आगीचा डोंब दिसून न आल्यामुळे स्फोटाबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर तुमसरात फॉरेन्सिक चमू दाखल होऊन पाहणी केली. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी एच.पी.सी.एल गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही चौकशी केली असता प्रथमदर्शनी हा स्फोट सिलिंडर्सने घडला यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. सखोल चौकशीनंतर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा स्फोट गॅस सिलिंडरनेच झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. मात्र स्फोटात जखमी झालेले नागपुरे यांच्या घरातील स्वयंपाक घरात वापरण्यात आलेले गॅस कनेक्शन हे त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यांच्या नावानेही रजिस्टर नसल्यामुळे जखमी किंवा मृतकाला विम्याचा कोणताही लाभ मिळू शकत नसल्याचे गॅस कंपनीने स्पष्ट केले आहे. या भयावह स्फोटात नाहक जीव गमवावा लागणाऱ्या मुरारी पिथोडे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणी होऊ लागली आहे. (शहर प्रतिनिधी)
‘तो’ स्फोट सिलिंडरचाच
By admin | Published: July 18, 2015 12:36 AM