ग्रामसेवक विवाह निबंधक : शर्तीचे उल्लंघन झाल्यास मंडळाची नोंदणी रद्दची तरतूद मोहाडी : आपल्या कार्यक्षेत्रातील विवाह जुळविणारी वधू-वर सूचक मंडळे अथवा व्यक्तींनी विवाह निबंधकांकडे नोंदणी करणे अनिवार्य व कायद्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी या कामासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत व जनगणना शहराकरिता ग्रामसेवक आणि शहरी भागामध्ये नगरपरिषद व नगरपंचायत कार्यक्षेत्राकरिता मुख्याधिकारी यांना विवाह निबंधक म्हणून अधिसूचित करण्यात आलेले आहे.विवाह मंडळाच्या नोंदणीसाठी विवाह मंडळ चालवू इच्छीणारी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट अशा विवाह मंडळाच्या नोंदणीकरिता, महाराष्ट्र विवाह मंडळ विनियम व विवाह नोंदणी नियम १९९९ मधील विहित नमून्यात विवाह निबंधकाकडे लेखी अर्ज करावयाचा आहे. प्रत्येक विवाह मंडळानी नोंदणी प्रमाणपत्र दिल्याच्या तारखेपासून दर दोन वर्षानी नवीकरणाची फी देवून नोंदणीचे नवीकरण करायचे आहे. विवाह मंडळांना संबंधित विवाह महंडळाची नोंदणी फक्त त्या कार्यक्षेत्रापुरतीआहे. कार्यक्षेत्राबाहेर काम करता येणार नाही. विवाह मंडळांना नोंदणीच्या अटी व शर्तीप्रमाणे काम करावयाचे आहे. शर्तीचे उल्लंघन झाल्यास मंडळाची नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे.अधिनियमाचे उल्लंघन झाल्यास व्यक्ती किंवा मंडळ अथवा पक्षकारावर अपराध सिद्ध झाल्यास पाच हजार रुपये दंड किंवा शिक्षा होण्यास पात्र राहील. (तालुका प्रतिनिधी)
विवाह मंडळांना निबंधकाकडे नोंदणी करणे अनिवार्य
By admin | Published: May 23, 2016 12:40 AM