२१ लोक ११ के
भंडारा : महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रतिनिधी मागील दहा वर्षांपासून नसल्यामुळे शिक्षकांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न, शासन निर्णयानुसार १ तारखेला वेतन देण्याचे असताना ते उशिरा होणे, विनाअनुदानित शाळांना अनुदान, जुनी पेन्शन योजना, अतिरिक्त शिक्षकांच्या समस्या अशा अनेक समस्या आ वासून उभ्या असताना विद्यमान शिक्षक आमदार या साध्या-साध्या शिक्षकांच्या अडचणी सोडवू शकले नाही, याची खंत वाटते. म्हणून राज्याच्या विधान परिषदेमध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रतिनिधी असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी नागभीड तालुका शिक्षक मेळाव्यात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, सिनेट सदस्य ॲड. गोविंदराव भेंडारकर, विमाशिचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, प्रसिद्धीप्रमुख प्रभाकर पारखी, उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य सुनील शेरकी, सहकार्यवाह अनिल कंठीवार, सोनाली दांडेकर, संघटक धनंजय राऊत, नागभीड तालुका अध्यक्ष प्रवीण नाकाडे, सचिव सतीश मेश्राम, सल्लागार डी. जी. ठाकरे, ब्रम्हपुरी अध्यक्ष भोजराज खोब्रागडे, रोहणकर, मुख्याध्यापक राऊत उपस्थित होते.
याप्रसंगी सुधाकर अडबाले म्हणाले, विनाअनुदानित शाळांचा प्रश्न, जुनी पेन्शन योजना, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न घेऊन कोण रस्त्यावर उतरून लढत आहे. हे विदर्भातील प्राध्यापक,मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. नागपूर विभाग विधान परिषद सदस्य (शिक्षक आमदार) पदाची निवडणूक डिसेंबर २०२२ मध्ये होत आहे. तेव्हा होैशी मंडळी या निवडणुकीत उतरणार आहे. आपण सर्वांनी सावध राहून सर्व प्राचार्य, मुख्याध्याक, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यापर्यंत पोहचून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने विदर्भाच्या सहाही जिल्हयात केलेल्या कामाचा आलेख पोहोचवायचा आहे, असेही ते म्हणाले. ॲड. गोंविदराव भेंडरकर म्हणाले की, सरकार्यवाह सुधाकर अडबाले हे शिक्षकांचे नेतृत्व करण्यास समर्थ असल्याचे सांगितले. याप्रसंगी श्रीहरी शेंडे, मत्ते, प्रवीण नाकाडे, डी.टी.ठाकरे, लक्ष्मणराव धोबे यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रवीण नाकाडे, संचालन आणि आभार प्रदर्शन सतीश मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील प्राध्यापक,मुख्याध्यापक,प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.