लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा धान्य साठा संपला आहे. उधारीवर कुठवर धान्य द्यायचे, असा प्रश्न देणाºयांना पडला. त्यामुळे बालकांना माध्यान्ह भोजन देण्यासाठी शिक्षकांची कसरत सुरू आहे. असाच प्रकार रोहणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला. शाळेतील तांदूळ संपला. आज जेवणाचा दिवस कोरडा जाणार म्हणून ग्रामशिक्षण समितीच्या सदस्यांसह चिमुकल्यांवर बालकदिनी रिकाम्या ताट्या वाजविण्याची वेळ आली. तथापि, सरपंच नरेश ईश्वरकर देवदूत बनून आले अन् त्यांनी दोन दिवसाचे तांदूळ देऊन ते या बालकांचे ‘चाचा’ बनले.शालेय पोषण आहारातील तेल अन् मीठही संपले. तरीही विद्यार्थ्यांना खाऊ घाला. कोणताही खंड पडू देऊ नका, १५ दिवसानंतर शासनस्तरावरून केली जाईल. किमान १५ दिवस तरी विद्यार्थ्यांना उपाशी ठेऊ नका, असे मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून ६ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापकाचा सभेत सांगण्यात आले होते. दोन महिने होऊनही ना तांदूळ ना अन्य साहित्य शाळांना मिळाला नाही. ज्या शाळांनी धान्यादी माल घेतले त्याचे बिलही देण्यात आले नाही. त्यामुळे हा संताप व्यक्त होत असताना रोहणा जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत एक महिन्यापासून तांदूळ संपले आहे. याची कल्पना मुख्याध्यापकांनी प्रशासनाला दिली. मुख्याध्यापकांनी उसणवार धान्य स्वस्त धान्य दुकानातून घेतले. परंतु असे उसणवार धान्य कुठवर द्यायचे, आपले उसणवार धान्य परत मिळणार कधी? या शंकेने धान्य दुकानदारांनी तांदूळ देणे बंद केले. आज भात शिजणार नाही. मुले उपाशी राहतील म्हणून ग्रामशिक्षण समितीचे दोन सदस्य शाळेत गेले. मुलेही वर्गाबाहेर आले. त्यानंतर मुलांनी ताटया वाजवा आंदोलन केले. आज बालकदिनी रिकाम्या ताटया वाजविण्याची वेळ प्रशासनाने मुलांवर आणली. सोमवारलाच सरपंच नरेश ईश्वरकर यांनी रोहणा ग्रामपंचायतचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी मंगळवारला सकाळी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता विद्यार्थी रिकाम्या ताटया वाजवित असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे गावातील मुले उपाशी राहू नये म्हणून सरपंच ईश्वरकर यांनी दोन दिवसाचे तांदूळ शाळेत पुरविले. माध्यान्हानंतर मुलांना अन्न खाऊ घालण्यात आले. बालकदिनी सरपंच नरेश ईश्वरकर हे त्या शाळेतील बालकांचे ‘चाचा’ ठरले. यापूर्वी उपसरपंच असताना त्यांनी त्या शाळेला माध्यान्ह भोजनासाठी ५० किलो तांदूळ पुरविले होते. धान्य शाळेत नाही याबाबत मुख्याध्यापक प्रकाश महालगावे यांनी शिक्षण विभागाच्या प्रशासनाला कळविले होते. आजही त्यांनी गटशिक्षणाधिकाºयांना पत्र दिले. प्रत्येक शाळेत धान्याचा साठा संपला आहे. आपल्या खिशातून पैसे खर्च करणाºया मुख्याध्यापकांना दैनंदिन भोजन देण्यासाठी संकटाचा सामना करावा लागत आहे.बालकांना उपाशी ठेवण्याचे कारस्थान शासनाकडून सुरू आहे. दोन्ही बाजूने मुख्याध्यापक पिळला जात आहे. शासनाचे हेच ‘अच्छे दिन’ का?. धान्याची व्यवस्था प्रशासनाने तातडीने करावी.- नरेश ईश्वरकर,सरपंच, ग्रा.पं. रोहणा.
बालकदिनी चिमुकल्यांवर आली ताट वाजविण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:14 AM
अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा धान्य साठा संपला आहे. उधारीवर कुठवर धान्य द्यायचे, असा प्रश्न देणाºयांना पडला.
ठळक मुद्दे‘चाचा’ ठरलेल्या सरपंचांची मदत : शालेय पोषण आहार पुरविणाºयावर संकट