भंडारा येथील येथील जागृत भृशुंड गणेश देवस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:52 AM2018-09-14T00:52:04+5:302018-09-14T00:53:05+5:30
विदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेल्या येथील भृशुंड गणेश जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवानिमित्त याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या शहरावर वसलेल्या भंडारा शहरात मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेल्या येथील भृशुंड गणेश जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवानिमित्त याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वैनगंगा नदीच्या शहरावर वसलेल्या भंडारा शहरात मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधलेल्या या मंदिरात श्रीगणेशाची आठ फुट उंच आणि चार फुट घेराव असलेली सुंदर व आकर्षक मूर्ती आहे. इतिहासाच्या नोंदीनुसार येथे श्री चक्रधर स्वामींनी भेट दिली. स्वामींची भेट व मूर्ती स्थापनेचा काळ जवळजवळ एकच असल्याचे जाणवते. त्यावरून ही मूर्ती ११३० मध्ये स्थापन झालेली असावी. गणेशमूर्तीसमोरील शिवलिंग व नंदीची स्थापना महंत अलोनीबाबा यांनी केली आहे. मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर सर्व दु:खाचा ºहास होतो अशी भाविकात मान्यता आहे. पवित्र श्रद्धा आणि शुद्ध मनाचे माहेरघर असल्याचे गाभाऱ्यात प्रवेश घेतल्यावर प्रचिती येथे. मूर्तीच्या उजव्या बाजूला हेमाडपंती शैलीतील एक दगडी शिवलिंग, शेंदरी रंगाचा नंदी आहे. शिवलिंगावर पितळी कवच लावण्यात आले आहे.
श्रींची मूर्ती अखंड शिळेवर कोरली आहे. पूर्ण शेंदूररचित मूर्ती चतुर्भूज असून मुषकावर विराजमान असल्याची नोंद आहे. उजवा पाय खाली सोडलेला असून डाव्या पायाची मांडी घातलेली आहे. चारही हातामध्ये पाश, अंकुश, मोदक आणि वरदहस्त आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. मुखमंडळाच्या जागी नाकपुड्या, डोळे, मिशा, दाढी दिसत असून चेहरा भव्य आहे. मुखापासून सोंड निघाली असून डाव्या हातावरील मोदकाकडे वळण घेतलेली आहे. कमरेपासून गुडघ्याच्या पातळीवर महावस्त्राचा पदर व मेखला स्पष्ट दिसते. मेंढा या परिसरात गीरीवंशीय गोसावी लोकांच्या समाधी समूहाचा एक भाग आहे. या समाधीस्थानी सुंदर नक्षीकामे केलेली आहेत. या स्थळावर गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची गर्दी होते. मात्र या भागाचा विकास झालेला नाही.
बिनाछत्रधारी हनुमंत
महावीर हनुमंताची मूर्ती भृशुंड गणेश मंदिराच्या आवारात आहे. विशेष म्हणजे या मूर्तीवर कोणतेही छत्र नाही. मूर्तीच्या वर शामियाना किंवा पक्के बांधकाम केल्यास ते टिकत नाही अशी आख्यायीका आहे. त्यामुळेच हा हनुमंत बिना छत्रधारी आहे.