लोकमत शुभ वर्तमान : बंधाऱ्यांनी फुलविले हास्य, मोहाडी तालुक्यात सहा कोटींची कामेराजू बांते मोहाडीनिसर्गाच्या भरवशावर एक-दोन पाण्याने भात शेती जायची. रबी पीक घेणे दुरापास्त होते. पाणी टंचाई असलेल्या शिवारात जलयुक्त शिवार योजना राबविली गेली. पाणी साठवण होऊ लागले. संरक्षित सिंचन क्षेत्र वाढले. भात पिक होऊ लागले. पिकाची हमी आल्याने शेतकऱ्यांमध्ये सुखद चित्र निर्माण झाल्याचे बघावयास मिळत आहे.सिंचन क्षेत्रात वाढवून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती निर्माण करण्याच्या हेतूने डिसेंबर २०१४ मध्ये ‘जलयुक्त शिवार’ योजना सुरू झाली. सन २०१५-२०१६ पासून जलयुक्त शिवार अभियान प्रत्यक्षात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेततळे, सिमेंट बंधारा दुरूस्ती, नाला खोलीकरण, मजगी पुनर्जिवन, बोडी नुतनीकरण, वृक्ष लागवड, साठवण बंधारा, साठवण बंधारा दुरुस्ती, मामा तलाव दुरुस्ती, साठवण तलाव, नाला सरळीकरण व खोलीकरण, कालवा दुरुस्ती आदी कामे केली जात आहेत. पहिल्या टप्प्यात करडी, मोहगाव, बोरी, बच्छेरा, उसर्रा, टांगा, देव्हाडा, नरसिंहटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव, कांद्री, शिवनी खैरलांजी अशा १५ गावांची या योजनेअंतर्गत विविध कामे घेण्यात आली. २८७ कामे पूर्ण झाली. या कामामुळे ४८५.३५ हेक्टर क्षेत्रात कामे करण्यात आली. त्यामुळे २४०६ एवढ्या क्षेत्रात दोन संरक्षित सिंचन पाण्याचा साठा निर्माण करता आला. २०१६-१७ यावर्षी महालगाव, डोंगरगाव, चिचोली, पाडोंगरी, आंधळगाव, नवेगाव, धोप, ताडगाव, जांब, हिवरा अशी १० गाव निवडण्यात आली. ९८.०७ हेक्टर क्षेत्रामध्ये १४२ कामे पूर्ण करण्यात आली. यामुळे ४४५.१६ हेक्टरमध्ये दोन संरक्षित सिंचन पाण्याचा साठा निर्माण करण्यात आला आहे. कृषी विभागाने व अन्य यंत्रनेने शेततळे, नालाखोली करण्याची कामे केली. त्यामुळे प्रखर उन्हाळ्यात ही कांद्री, खैरलांजी, बच्छेरा आदी गावाच्या नाल्यात व शेततळ्यात पाणी दिसू लागले आहे. दुरवर पाण्याचा शोध नसताना अशा स्थितीत पक्षी, जनावरे, माकडे या साठवलेल्या पाण्याने तृष्णा भागवत असल्याचे दिसून आले. दोन वर्षापुर्वी कांद्री सुखदेव मांढरे यांनी जलशिवारातून शेततळे तयार केले. पाऊण एकरात भात, गहू, वांगा ही पिके घेतात. सोबतच मत्स्य पालन सुरू केले. शेततळ्यात सिंचित जलसाठ्यावर उदर निर्वाह करीत आहे. बच्छेरा येथील भरत शहरे यांची पडीक जमीन होती. नाला खोलीकरण व बंधारा दुरूस्तीनंतर पाणी साठवण होत गेल्यामुळे लगतची शेतजमीन सुपीक झाली. आता एक वर्षापासून धान, गहू, वांग्याचा पीक घेत आहे. पडीक जागेला समृध्द करण्याची किमया पाणी साठवणीमुळे झाली. बच्छेऱ्यात तर आधी नाला खोलीकरण होवू दयायच नाही अशी काही लोकांची भुमिका होती. ज्यांना या नाला खोलीकरणाचा त्रास होणार होता अशांनी अधिकाऱ्यांचा बोलण्यावर विश्वास ठेवला. आज विरोध करणारेच म्हणतात, साहेबांमुळे आम्ही समृध्द होवू लागलोय, ही प्रतिक्रीया नीळकंठ झंझाड देताना चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.करडी क्षेत्रात मागीलवर्षी पाऊस कमी झाला होता. नाल्यात साठवण झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर रोवणी केली. दोनशे मीटर अंतरपर्यंत शेतकऱ्यांनी नाल्यातील पाणी नेले. धानपिक हाती आणता आले. एवढेच नाही, करडीक्षेत्र व मोहाडी क्षेत्रात मजगीच्या कामामुळे ४४ हेक्टर पडीक जमीन लागवडीखाली जलशिवार योजनेमुळे आणता आली. दोन वर्षात २ हजार ८५१ हेक्टर क्षेत्रासाठी जलयुक्त शिवारमुळे टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. दोन वर्षापुर्वी जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामाचा फायदा आज दिसून येत आहे. पुढेही जलयुक्त शिवाराच्या कामाचे फायदे चांगले परिणामकारक होतील, असे तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी सांगितले.
‘जलयुक्त शिवार’ने शेतकरी होऊ लागला समृद्ध
By admin | Published: April 13, 2017 12:24 AM