३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ : लाभ घेण्याचे नाना पटोले यांचे आवाहनभंडारा : प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये जिल्हयात आतापर्यंत ३ लाख ९५,८१७ बँक खाते उघडण्यात आले आहे. या योजनेला ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत आता ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. हे खाते झिरो बॅलन्सवर उघडण्यात येत असले तरी या खात्यातून खातेदाराला ५ हजार रुपयापर्यंत रक्कम काढता येते. या योजनेतील खातेधारकांला २ लाख रुपयापर्यंतचे विमा सुरक्षा उपलब्ध होते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून बँकेत खाते उघडावे, असे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरज कुमार, नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी संजय पाठक उपस्थित होते. जनधन योजनेतील खातेधारकाने ६ महिनेपर्यंत जर बँक व्यवहार केले नाही, तर ते खाते बंद होते. त्यामुळे खातेधारकांनी या खात्यामार्फत सतत बँक व्यवहार करणे आवश्यक आहे. तसेच ५ हजार रुपयापर्यंत कधीही बँक खात्यातून रक्कम काढता येते. मात्र काढलेली रक्कम पुन्हा बँक खात्यात जमा करणे आवश्यक असल्याची माहिती खादार नाना पटोले यांनी दिली. असंघटीत क्षेत्रातील लोकांना स्वयंरोजगार करण्यासाठी आणि अस्तित्वातील रोजगार वाढविण्यासाठी कर्ज मिळणे सोयीस्कर व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेअंतर्गत सहज कर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली आहे. योजनेमध्ये ५० हजार ते ५ लाख रुपयापर्यंत तर तरुण योजनेत ५० हजार ते १० लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी १० टक्के व्याज दर आकारण्यात येतो, असेही नाना पटोले म्हणाले. मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्हयात १५६२ लोकांना कर्ज उपलब्ध करुन दिले असून ४ कोटी ९८ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमानतदाराची आवश्यकता नाही. मात्र, पूर्वी एखाद्या बँकेचे कर्ज थकीत असणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळणार नाही. कर्ज परत करण्याची मुदत ५ वर्ष आहे. प्रधानमंत्री विमा योजने अंतर्गत ( १२ रुपये ) जिल्हयात आतापर्यंत १ लाख ६ हजार ७९ लोकांनी विमा काढला असून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा (३३० रुपये) योजनेचा लाभ आतापर्यंत १ लाख १० हजार ६५० लोकांनी घेतला आहे. त्याचबरोबर अटल पेंशन योजनेमध्ये ७१६ लाभधारक आहेत.या सर्व योजनांच्या संदर्भात काही व्यक्ती व संस्थांकडून जनतेची दिशाभूल करणारे पत्रक वाटले जात आहेत. मात्र, जनतेने या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी न पडता नागरिकांनी थेट बँकेशी संपर्क करावा, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)
जनधन योजनेला तळागाळात पोहोचविणे आवश्यक
By admin | Published: October 09, 2015 1:12 AM